मिरज : दुबईतील जान जबेल अल नजर फूडस्टफ या कंपनीने तीन कोटी रुपये किमतीची द्राक्षे मागवून मिरजेतील द्राक्ष व्यापाऱ्यास २ कोटी ८० लाखांचा गंडा घातला. याप्रकरणी गांधी चाैक पोलिसांनी आंधप्रदेश येथून दुर्गा प्रसाद कुणा या एका आरोपीस अटक केली. न्यायालयाने त्यास चार दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
मिरजेतील पांडुरंग जगताप यांची ऑल एशिया इंपोर्ट अन्ड एक्सपोर्ट या नावाची कृषी माल निर्यात करणारी व्यापारी फर्म आहे. या फर्ममार्फत जगताप हे गेली काही वर्षे फळे, भाजीपाला व ड्रायफ्रुटस परदेशात निर्यात करतात. दुबईतील जानजबेल अल नजर फूडस्टफ ट्रेडिंग या कंपनीने वेबसाईटच्या माध्यमातून जगताप यांच्याशी संपर्क साधून द्राक्षांची मागणी नाेंदविली हाेती. त्यानुसार जगताप यांनी सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांची निर्यातक्षम द्राक्षे जहाजाने दुबईला पाठविली. जान कंपनीचे व्यवस्थापक सुबिध व आनंद देसाई यांनी द्राक्षे पोहोचल्यानंतर पैसे देणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार द्राक्षाचे तीन कंटेनर दुबईत पोहोचल्यानंतर तीन टप्प्यांत २५ लाख रुपये मार्च महिन्यात पाठविले. दरम्यानच्या काळात या कंपनीने आणखी १२ कंटेनर जगताप यांच्याकडून मागविले. या १५ कंटेनरच्या ३ कोटी ५ लाख बिलापैकी २ कोटी ८० लाख बाकी देण्यास कंपनीने टाळाटाळ सुरू केली. ११ एप्रिलपासून त्यांचे फोन बंद आहेेत. याप्रकरणी दुबईतील जान जबेल अल नजर फूडस्टफ कंपनीचे सुबिध, आनंद देसाई व त्यांच्या साथीदारांविरुद्ध २ कोटी ८० लाखांची फसवणूक केल्याची फिर्याद पांडुरंग जगताप यांनी गांधी चाैक पोलिसांत दिली आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रोहिदास पवार यांनी त्यांचा साथीदार असलेल्या दुर्गा प्रसाद कुणा याला आंध्रप्रदेश येथून ताब्यात घेऊन मिरजेस आणले आहे. इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.