मिरज : मिरजेतील उत्तमनगर येथे प्रवाशाला अडवून चार हजार ७०० रुपये लुटणाऱ्या चार जणांना महात्मा गांधी चौक पोलिसांनी केवळ सहा तासात ताब्यात घेतले. त्यांच्या ताब्यातील बुलेट गाडी जप्त केली आहे.
शहरात उत्तमनगर वसाहतीत शनिवारी (दि. ४) पहाटे ४ वाजता संगमेश्वर गायकवाड (रा. लातूर) हे आपल्या चारचाकी गाडीतून जात असताना चौघांनी त्यांच्या चारचाकी गाडीत बसून त्यांच्या पाकिटातील चार हजार ७०० रुपयांची रक्कम लुटली. याबाबत संगमेश्वर गायकवाड यांनी महात्मा गांधी चौक पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास करत केवळ सहा तासात चार संशयित तरुणांना ताब्यात घेतले. सदरची कारवाई सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद खाडे, बाळासाहेब निळे, बंडू पाटील, रिचर्ड स्वामी, अमोल आवळे, चंदू गायकवाड, अमर मोहिते, उदय कुलकर्णी यांच्यासह स्थानिक गुन्हे पथकाने केली आहे.