सांगली : खंडणीच्या गुन्ह्यातील साक्षीदार गोरखनाथ ऊर्फ मनोज माने याचा खून करून रातोरात गायब झालेला गुंड म्हमद्या नदाफ सांगलीतच संजयनगर पोलिसांना गुंगारा देत आर्थिक मदत घेण्यासाठी भटकत असल्याचे शनिवारी पोलिसांच्या चौकशीतून उजेडात आले आहे. गेल्या आठवड्यात त्याने शंभरफुटी रस्त्यावरील एका चिरमुरे व्यापाऱ्याच्या घरी जाऊन पैशाची मागणी केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे शनिवारी या चिरमुरे व्यापाऱ्यासह चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ताब्यात घेतलेल्यांमध्ये चिरमुरे व्यापारी इलियास पाशा शेख (वय ४२), त्याचा मेहुणा अब्दुल बादशहा शेख (३१), तसेच जुबेर मुस्ताक मुजावर (२१), कलीम आयुम मुन्शी (२३, चौघे रा. शंभरफुटी रस्ता, सांगली) यांचा समावेश आहे. आर्थिक वाद व खंडणीचा गुन्हा मागे घेण्यास नकार दिल्याने वीस दिवसांपूर्वी म्हमद्या नदाफ व त्याच्या साथीदारांनी मनोजचे अपहरण करून धारदार शस्त्रांनी हल्ला करुन निर्घृण खून केला होता. याप्रकरणी प्रत्यक्ष खुनात सहभागी असलेल्या सागर शेंडगे, कमर मुजावर यांच्यासह दहाजणांना आतापर्यंत अटक केली आहे. यामध्ये आठजण म्हमद्याला खून होण्यापूर्वी व खून केल्यानंतर मदत केलेले संशयित आहेत. पण अद्याप म्हमद्या सापडला नाही. त्याच्या शोधासाठी पोलीस रात्रं-दिवस झटत आहेत. आतापर्यंत शहरातील प्रत्येक भागात ‘कोम्बिंग आॅपरेशन’, नाकाबंदी करण्यात आली. मात्र तरीही म्हमद्याचे धागेदोरे लागलेले नाहीत. म्हमद्याने शरण यावे, यासाठी त्याला ‘वॉन्टेड’ घोषित केले आहे. याशिवाय त्याच्या मालमत्तेवर टाच आणण्यासाठी न्यायालयीन प्रक्रिया सुरु केली आहे. खून केल्यानंतर म्हमद्या त्याची आई व भावाला भेटून गेल्याचे समजताच पोलिसांनी शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. त्याला मदत करणाऱ्यांची यादी बनविली होती. काही मदतगारांच्या नाड्याही आवळल्या आहेत. त्यामुळे म्हमद्याची चारही बाजूने कोंडी झाली आहे. पोलिसांच्या कारवाईचा ससेमीरा टाळण्यासाठी व उदरनिर्वाह करण्यासाठी त्याला आर्थिक चणचण भासत आहे. यासाठी गेल्या आठवड्यात त्याने शंभरफुटी रस्त्यावरील चिरमुरे व्यापारी इलयास शेख याचे घर गाठले. परंतु इलियास घरी नव्हता. त्याचा मेहुणा अब्दुल शेख होता. इलियासची भेट न झाल्याने म्हमद्या निघून गेला. त्यामुळे या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. कलीम मुन्शी याची दुचाकी जुबेर मुजावर वापरत होता. मात्र जुबेरने ही दुचाकी म्हमद्याला पुरविल्याचे स्पष्ट झाल्याने या दोघांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. म्हमद्याला मदत करणाऱ्यांनी पलायन केले आहे. त्यांचा शोध सुरू आहे. (प्रतिनिधी) प्रकाश गायकवाड : नागरिकांनी माहिती द्यावी पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड म्हणाले, म्हमद्या मदतीसाठी त्याच्या परिचयाच्या लोकांकडे जात असल्याची माहिती मिळत आहे. याच माहितीआधारे चौघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. यातील कलीम मुन्शीला चौकशी करून सोडून दिले आहे. मदतीसाठी तो सांगलीत फिरत असल्यास व कोणाकडे जात असल्याचे संबंधितांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधून माहिती द्यावी. तसेच त्यांनी केल्यास पोलीस त्यांच्या पद्धतीने कारवाईचा बडगा उगारतील. खानला पोलीस कोठडी शुक्रवारी म्हमद्याला शस्त्रांचा पुरवठा केल्याप्रकरणी अटक केलेल्या वासीम खान यास न्यायालयाने शनिवारी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. मनोजचा खून केल्यानंतर त्याने म्हमद्याला स्वत:च्या घरी आश्रय दिल्याचे चौकशीतून पुढे येत आहे.
गुंड म्हमद्याचे चार साथीदार ताब्यात
By admin | Updated: November 29, 2015 00:59 IST