इस्लामपूर : यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीत संस्थापक पॅनल राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या माध्यमातून राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांच्या मदतीसाठी दबाव आणत आहेत; परंतु जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी आपली भूमिका तटस्थ राहील, असे कार्यकर्त्यांकडे स्पष्ट केले आहे.
कारखान्याच्या अक्रियाशील सभासदांचा निर्णय सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिल्यानंतर या महिनाअखेर निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. कारखान्याच्या निवडणुकीत पक्षीय राजकारण आणण्याचा डाव सुरू आहे. संस्थापक आणि रयत पॅनल एकत्रित करण्यासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांनी हिरवा कंदील दाखवला असल्याचे बोलले जात आहे; परंतु याबाबत राष्ट्रवादीकडून घोडे अडले आहे.
सभासदांच्या यादीचा प्रश्न सहकारमंत्री पाटील यांनी निकाली काढला आहे. जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि सहकारमंत्री बाळासाहेब पाटील या दोन मंत्र्यांनी सहकार पॅनलच्या विरोधात उतरावे, यासाठी डॉ. इंद्रजित मोहिते आणि अविनाश मोहिते यांना यश आलेले नाही.
‘कृष्णा’च्या निवडणुकीचा इतिहास पहिला असता मोहिते आणि भोसले यांच्यातील दुरंगी लढती महाराष्ट्राने पहिल्या आहेत. त्यात पक्षीय राजकारण कधीच आले नाही. दहा वर्षांपूर्वी अविनाश मोहिते यांच्या रूपाने संस्थापक पॅनल रिंगणात आले; परंतु मोहिते आणि भोसले या दोन भावांच्या राजकारणात पाच वर्षांतच संस्थापक पॅनल उतरतीला लागले. आता यंदा पुन्हा शरद पवार यांचा आधार घेऊन सहकार पॅनलविरोधात लढण्याची तयारी ते करत आहेत; परंतु कऱ्हाड आणि वाळवा तालुक्यांतील राष्ट्रवादीची भूमिका गुलदस्त्यात असल्याने रयत आणि संस्थापक पॅनलसमोर आव्हान उभे राहिले आहे.
कोट
वाळवा तालुक्यातील आम्ही सर्व संचालक, कार्यकर्ते जयंत पाटील यांना भेटलो.
त्यावेळी त्यांनी स्पष्ट केले की, ‘कृष्णे’च्या निवडणुकीत तिन्ही गटात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विखुरलेले असल्यामुळे निवडणुकीत भाग घेऊन माझ्या कार्यकर्त्यांना नाराज करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. प्रत्येक कार्यकर्ता आपापला निर्णय घेण्यास पात्र आहे.
- लिंबाजी पाटील,
माजी उपाध्यक्ष, कृष्णा कारखाना
फोटो सिंगल : जयंत पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील