लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख संदीप तमाण्णा सुतार (वय ५२) यांचे सोमवारी निधन झाले. शिवसेनेसह विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी गर्दी केली होती. त्यांच्या पश्चात भाऊ, भावजय, पुतणे असा परिवार आहे.
माजी महापौर गीता सुतार यांचे ते दीर होत. सुतार यांनी प्रदीर्घ काळ शिवसेनेत काम केले. सध्या ते राजकारणापासून अलिप्त होते. शिवसेना शहर उपप्रमुख पदापासून जिल्हाप्रमुख पदापर्यंत त्यांनी पक्षाची विविध पदे भूषविली. पुणे म्हाडाचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले हाेते. महापालिका स्थापनेनंतर पहिल्याच निवडणुकीत त्यांचा निसटता पराभव झाला होता. शिवसेनेतून नारायण राणे, राज ठाकरे बाहेर पडल्यानंतरही जिल्ह्यातील अनेक शिवसैनिकांनी या दोन्ही नेत्यांबरोबर राहणे पसंत केले. मोजक्याच शिवसैनिकांसोबत सुतार यांनी शिवसेनेत राहणे पसंत केले होते. दुष्काळी परिस्थितीत चारा छावणी उभारण्याच्या कामातही त्यांनी पुढाकार घेतला होता. विविध सामाजिक प्रश्नांवर आंदोलने करून त्यांनी पक्षाची धुरा सांभाळली होती.