कुपवाड : तानंग (ता. मिरज) येथील माजी सरपंच जगन्नाथ तुकाराम पाटील (वय ६०) यांचा बुधवारी सकाळी शेतातील वीज कनेक्शनच्या इलेक्ट्रिक वायरचा धक्का लागून जागीच मृत्यू झाला. ते शेतात पिकांना पाणी पाजण्यासाठी गेले होते. शेतातील वीज कनेक्शनची वायर तुटून खाली पडल्याने ही दुर्घटना घडली.
जगन्नाथ पाटील बुधवारी सकाळी शेतातील पिकांना पाणी पाजण्यासाठी गेले होते. त्यावेळी शेतातील बोअरवेलच्या वीज कनेक्शनची वायर तुटून खाली पडली होती. त्या वायरमधून विद्युत धक्का बसल्याने पाटील यांचा जागेवरच मृत्यू झाला. दुपारी त्यांच्या मुलाने त्यांना मोबाइलवरून संपर्क साधला असता त्यांनी उत्तर दिले नाही.
त्यामुळे मुलाने शेतात जाऊन बघितले असता पाटील विजेच्या वायरवर पिकात पडल्याचे दिसले. त्यांनी तात्काळ विद्युत पुरवठा बंद केला. ही माहिती समजताच उपसरपंच दीपक पाटील व इतर नातेवाइकांनी त्वरित शेतात धाव घेतली. त्यानंतर या घटनेची माहिती उपसरपंच पाटील यांनी कुपवाड पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक राजू अन्नछत्रे यांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन पोलिस पंचनामा केला. त्यानंतर हेल्पलाइन टीमच्या मदतीने मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल केला. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, सुना व नातवंडे, असा परिवार आहे.