मिरज : मिरजेतील समतानगर येथे तीन महिन्यांपासून पिण्याचे पाणी येत नाही. याप्रश्नी माजी महापौर संगीता खोत यांनी नागरिकांसह पाणीपुरवठा कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन केले. अधिकाऱ्यांनी दहा दिवसांत सुरळीत पाणीपुरवठ्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
मिरजेतील प्रभाग सातमध्ये समतानगरसह परिसरातील अनेक भागात अमृत योजनेची जलवाहिनी बसविण्यात आली आहे; मात्र नवीन योजना कार्यान्वित झाल्यानंतरही गेले तीन महिने या परिसरात अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. यामुळे नागरिक हैराण आहेत. याबाबत वारंवार तक्रार केल्यानंतरही पाणीपुरवठा विभागाकडून दखल घेतली गेली नाही. यामुळे येथील नागरिक संतप्त आहेत. सोमवारी माजी महापौर संगीता खोत यांच्यासह नागरिकांनी पाणीपुरवठा अभियंता पांडव यांना चांगलेच धारेवर धरले. जोरदार घोषणाबाजी करत पाण्याच्या टाकीसमोर ठिय्या आंदोलन केले. यावेळी दहा दिवसांत सुरळीत पाणीपुरवठ्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले.