वाळवा : वाळवा येथे साेमवारी सकाळपासून कृष्णा नदीचा पूर ओसरण्यास सुरुवात झाली. ग्रामपंचायतीच्यावतीने रस्त्यावर पडलेला गाळ जेसीबीद्वारे काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. महावितरणनेही परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी यंत्रणा राबविली आहे. हुतात्मा कारखान्यातर्फे पूरग्रस्तांच्या भोजनाची सोय अध्यक्ष वैभव नायकवडी यांनी केली आहे. हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी व ग्रामपंचायतीतर्फेही पूरग्रस्तांच्या जेवणाची सोय करण्यात आली आहे.
वाळवा ग्रामविकास सोसायटीच्या पिछाडीस आलेले पुराचे पाणी ओसरले आहे. नेमिनाथनगर, महात्मा फुलेनगर, पेठभाग, हाळभाग, कोटभाग वाळवा येथे पुराचे पाणी मोठ्या प्रमाणात शिरले होते. काही ठिकाणी घरांची पडझड झाली. कोटभाग व पेठभाग यांना जोडणाऱ्या बाजार मैदानाजवळील पुलावर अद्याप तीन फूट पाणी आहे. जिल्हा परिषद शाळा नंबर १, वीराचार्य चौक, काळा मारुती मंदिर, मधला मारुती मंदिर, दत्त मंदिर, जोतिबा मंदिर, खंडोबा मंदिर, नागराज मंदिर, जैन मंदिर परिसरातील पाणी ओसरले आहे. या ठिकाणी स्वच्छता सुरू आहे.
अनेक ठिकाणी दुकानात पाणी गेल्याने नुकसान झाले आहे. नदीकाठी पिके नष्ट झाली आहेत. ऊस, सोयाबीन, हुलगा, कडधान्ये, भाजीपाला, फळभाज्यांचे नुकसान झाले आहे. भुईमूग, ज्वारी, सूर्यफूल आणि द्राक्षे बागा नष्ट झाल्या आहेत.