लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा-वाळवा तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे वारणा व मोरणा नदीला आलेल्या महापुरामुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्त शेतकरी व पूरबाधित कुटुंबीयांना तातडीने नुकसानभरपाई मिळावी, यासह विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांना भाजपच्या वतीने देण्यात आले.
यावेळी माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक, जि.प. माजी उपाध्यक्ष सत्यजित देशमुख उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, शिराळा व वाळवा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यामुळे वारणा-मोरणा नदीकाठच्या गावांना मोठा फटका बसला. हजारो एकर शेती पाण्याखाली गेली. काही गावांमध्ये मुख्य बाजारपेठेमध्ये पाणी शिरून व्यापाऱ्यांचे नुकसान झाले आहे. कणेगाव, भरतवाडी या गावांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव प्रशासनाच्या दिरंगाईमुळे व स्थानिक अडचणीमुळे प्रलंबित आहे, तो मार्गी लागावा. ऐतवडे खुर्द येथेही स्थलांतराबाबत उपाययोजना कराव्यात. ठाणापुढे येथील शासकीय घरकुलातही पाणी शिरत असल्याने तेथील घरांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यांना सुरक्षित ठिकाणी नव्याने घरे बांधून द्यावेत. ग्रामपंचायत कार्यालयामध्ये वॉकी- टॉकी यंत्रणा उपलब्ध करावी. दरडी कोसळण्याचे प्रकार घडले आहेत, त्याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य संपतराव देशमुख, सुखदेव पाटील, रणजितसिंह नाईक, प्रतापराव यादव, के. डी. पाटील, सम्राट शिंदे, एन. डी. लोहार, वसंत पाटील, भटवाडीचे सरपंच विजय महाडिक, कुलदीप निकम, सचिन यादव, सागर पाटील, विलास एटम, नामदेव पाटील उपस्थित होते.