सांगलीतील रोहित आणि सोनाली या दाम्पत्याची वरात थेट महापुरातूनच काढण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोणी विमानात वधूला वरमाला घालतो, तर कोणी समुद्राच्या तळाला जाऊन शुभमंगलची संधी साधतो. सांगलीतल्या एका पठ्ठ्याने चक्क महापुरातच लग्नाची वरात काढली. कंबरेइतक्या पाण्यात होडीतून बायकोला घरी आणले.
सांगलीतला हा पठ्ठ्या भलताच चर्चेत आला असून, वरातीचा व्हिडिओ जोरात व्हायरल होत आहे. मारुती चौकात कंबरेइतक्या पाण्यातून नवविवाहित दाम्पत्य हळदीच्या अंगाने घराकडे येत असल्याचे व्हिडिओतून दिसते. गावभागातील रोहित सूर्यवंशी आणि सोनाली बल्लारी यांच्या लग्नासाठी सोमवारचा (दि.२६) मुहूर्त धरला. कृष्णेच्या महापुरात गावभाग परिसर बुडाला. रोहितच्या घराला चोहोबाजूंनी पाण्याने वेढले; पण मुहूर्त तर गाठायचाच होता.
मित्रांनी शक्कल लढविली. संकल्प फाउंडेशनची मदतकार्याची बोट आणली. वर मुलगा घोड्याऐवजी बोटीतून वधूच्या घरी गेला. लग्नाचा बार उडविला आणि बोटीतूनच वरात निघाली. डोक्याला मुंडावळ्या आणि अंगावर ओली हळद अशा नवपरिणीत जोडप्याच्या संसाराची नैया कृष्णेच्या महापुरातूनच निघाली. वरात झोकात निघाली. बँडबाजा नसला तरी कृष्णेच्या पाण्याचा खळखळाट मात्र सोबतीला होता. भर महापुरातून निघालेली जोडप्याची वरात पाहण्यासाठी सांगलीकरांनी इमारतींच्या खिडक्यांमध्ये गर्दी केली होती. महापुरातील ही वरात सोशल मीडियावरून चांगलीच व्हायरल झाली.