लोकमत न्यूज नेटवर्क
भिलवडी
: संभाव्य पूरस्थितीचा विचार करता कृष्णाकाठच्या गावातील नागरिकांना बोट चालविण्याचे प्रशिक्षण पलूस तालुका प्रशासनाच्या वतीने देण्यात आले. भिलवडी व औदुंबर (ता. पलूस) येथील कृष्णा नदीपात्रात महापूर आपत्ती प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी प्रशासकीय अधिकारी यांनी स्वतः यांत्रिक बोट चालवून बोट सुस्थितीत असल्याची खात्री करून घेतली.
कडेगावचे प्रांताधिकारी गणेश मरकड, तासगाव विभाग उपविभागीय पोलीस अधिकारी अश्विनी शेंडगे, पलूसचे तहसीलदार निवास ढाणे, नायब तहसीलदार राजेंद्र पाटील, गटविकास अधिकारी स्मिता पाटील, पलूस पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विकास जाधव, भिलवडी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक कैलास कोडग, आदी अधिकारी यामध्ये सहभागी झाले. यावेळी भिलवडी, अंकलखोप येथे ग्रामपंचायतीकडे असणाऱ्या यांत्रिक बोटींची तपासणी केली. या बोटींचे इंजिन सुस्थितीत आहे का? याची पाहणी केली. त्याचबरोबर प्रशासकीय अधिकारी यांनी स्वतः यांत्रिक बोटीमध्ये बसून, नदीपात्रातून फिरून परिस्थितीचा आढावा घेतला. महापुरात कृष्णाकाठचे तारणहार ठरलेले बोट चालक नितीन गुरव यांनी सर्वांना मार्गदर्शन केले. यावेळी अंकलखोपचे सरपंच अनिल विभूते, भिलवडीचे तलाठी गौसमहंमद लांडगे, अंकलखोपचे तलाठी जी. बी. सूर्यवंशी, मंडल अधिकारी राजू जाधव उपस्थित होते.
कोट -
महापुराचा सामना करण्यासाठी पलूस तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन सुसज्ज आहे. येणाऱ्या आपत्तीत लोकांना वाचविणारे यांत्रिक बोट चालक प्रशिक्षित असल्यास धोका टाळता येऊ शकेल.
- गणेश मरकड, प्रांताधिकारी.