सांगली : प्रजासत्ताक दिनानिमित्त मंगळवारी (दि.२५) पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते सांगलीत ध्वजारोहण करण्यात येणार आहे. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर मुख्य शासकीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रशासनाने कार्यक्रमाची तयारी पूर्ण केली असून, या कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या नागरिकांनी कोरोनाविषयक उपाययोजनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केले आहे.
पोलीस परेड मैदानावर होणाऱ्या कार्यक्रमात सकाळी सव्वानऊ वाजता पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण समारंभ होईल. मुख्य शासकीय सोहळ्यास नागरिकांना उपस्थित राहता यावे यासाठी या कालावधीत कोणीही ध्वजारोहण कार्यक्रम आयोजित करू नये, अशी सूचना देण्यात आली आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहणाऱ्या नागरिकांनी मास्कचा वापर करावा, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, कोणतीही बॅगजवळ बाळगू नये व कार्यक्रमाअगोदर दहा मिनिटे आसनस्थ होऊन प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.