सांगली : मौल्यवान खडा परदेशातून तपासणी करून आणण्यासाठी सांगलीतील व्यावसायिकास सव्वा पाच लाखांना गंडा घालणाऱ्या संशयितांवर अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दीपक पाटील (वय ४५), दिलावर मन्सुर पटेल (४४, दोघेही रा. नांदणी, शिरोळ), अरुण साखरे (५५, इचलकरंजी), तात्यासाहेब आप्पासाहेब आडके (४२, रा. जयसिंगपूर) आणि एका अनोळखीवर विश्रामबाग पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, व्यावसायिक असलेले फिर्यादी संदीप महादेव बोरगावे शारदानगर परिसरात राहण्यास आहेत. संशयितांनी बोरगावे यांचा विश्वास संपादन करून ओळख निर्माण करीत त्यांना सुलेमान पथ्थर नावाचा मौल्यवान खडा तपासणी करून आणण्यासाठी पाच लाख २५ हजार रुपये घेतले होते. पैसे परत मागूनही संशयितांनी ते देण्यास टाळाटाळ केली होती. त्यानंतर बाेरगावे यांनी विश्रामबाग पोलिसांत फसवणुकीची फिर्याद दाखल केली होती. त्यानुसार संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांच्या शोधासाठी पथके रवाना करण्यात आली आहेत.