लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : येथील खणभागातील मच्छी मार्केटच्या नूतनीकरणाचा पाच कोटी ३६ लाख रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. सोमवारी आयुक्त नितीन कापडणीस यांच्या दालनात गाळेधारकांशी चर्चा करून आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी भाजपच्या नगरसेविका ॲड. स्वाती शिंदे यांनी गाळ्याचे क्षेत्र वाढविण्याची मागणी केली. नवीन मच्छी मार्केट उभारणीला गाळेधारकांनी सहमती दर्शविली.
खणभागात तत्कालीन सांगली नगरपालिकेने मटण व मच्छी मार्केट उभारले होते. या मार्केटची दुरवस्था झाली आहे. सुविधांचाही अभाव आहे. या मार्केटमध्ये ७० गाळे आहेत. त्यापैकी अनेक गाळे बंद आहेत. मच्छी मार्केट मात्र नियमितपणे सुरू असते. नगरसेविका स्वाती शिंदे, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर यांनी मच्छी मार्केटच्या नूतनीकरणासाठी आयुक्तांकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार प्रशासनाने साडेपाच कोटींचा आराखडा तयार केला आहे.
सोमवारी आयुक्त नितीन कापडणीस यांनी गाळेधारकांची बैठक घेतली. यावेळी महापौर दिग्विजय सूर्यवंशी, स्थायी सभापती पांडुरंग कोरे, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते. गाळेधारकांनीही नूतनीकरणाला सहमती दर्शविली. ॲड. शिंदे यांनी बैठकीत काही आक्षेप नोंदविले. मार्केटमधील गाळ्यांचे क्षेत्रफळ फारच कमी आहे. त्यामुळे त्यांना जागा वाढवून देण्याची मागणी त्यांनी केली. तसेच सध्याच्या गाळेधारकांचाच प्राधान्याने विचार करावा. जादा गाळे बांधून त्याचा लिलावाद्वारे बाजार करू नये. नूूतन मार्केटचा प्रस्ताव तातडीने मंजुरीसाठी राज्य व केंद्र शासनाकडे पाठवावा, अशी भूमिका घेतली. अखेर वाढीव जागेसह सुधारित आराखडा करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला.