कवठेमहांकाळ : कुकटोळी (ता. कवठेमहंकाळ) येथील जुना पन्हाळा डोंगराला रविवारी दुपारी दीड वाजता बेळंकीतील गवाणे मळ्यातील एका शेतकऱ्याने डोंगरपायथ्याला असलेल्या शेतातील बांधावरील काटे पेटविण्यासाठी आग लावली होती. ती आग वाऱ्यामुळे डोंगराच्या दिशेने लागली. ही आग हनुमान खिंड ते गौसिद्ध जुना पन्हाळावर सपाटीपर्यंत आगीने पेट घेतला होता.
ही आग विझवण्यासाठी बेळंकीतील विजयनगर व कुकटोळीतील मासाळवाडी येथील तरुणांनी धाव घेतली. गौसिद्ध मंदिरातील पाणी व झाडाच्या फांद्यांच्या साहाय्याने तरुणांनी आग आटोक्यात आणली. अखेर तीन ते चार तासांनंतर आग आटोक्यात आली. सायंकाळी पाच वाजता आग विझवण्यात यश आले.
तोपर्यंत तीस ते चाळीस हेक्टर डोंगर जळून खाक झाले होते. यामध्ये छोटे वन्यजीव, छोटे पक्षी मरण पावले. वेळीच आग विझल्याने मोठा अनर्थ टळला.
अण्णाप्पा कोरे, अंकुश कोरे, सुनील कोरे, प्रभानंद गवाणे, विजय वासूदकर, पवन भंडारे, किरण वासूदकर, विठ्ठल भंडारे अनेक तरुणांच्या सहकार्याने आग विझविण्यात यश आले.