फोटो ओळ :
कोंत्येवबोबलाद (ता. जत) येथील दत्ता हरिसक परीट यांच्या घर, हाॅटेलला अचानक आग लागून ते जळून खाक झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
संख : कोंंत्येवबोबलाद (ता. जत) येथील दत्ता हरिसक परीट यांच्या राहत्या छप्परवजा पत्राघराला व शेजारील हाॅटेलला अचानक आग लागली. यामध्ये २ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले. आगीत रोख रक्कम, गॅस, फ्रीज, कपाट, संसारोपयोगी साहित्य, धान्य, हॉटेलसाहित्य जळून खाक झाले. ही घटना रविवारी पहाटे चार वाजता घडली.
याबाबतची अधिक माहिती अशी की, कोंत्येवबोबलाद गावापासून पूर्वेला अर्धा किलोमीटर अंंतरावर अहमदनगर-विजापूर राष्ट्रीय महामार्गालगत दत्ता परीट कुटुंंबासह छप्परवजा पत्राशेडमध्ये राहतात, तर आई, वडील शेेेतात राहतात. राहत्या घरामध्येच ते हॉटेल व्यवसायही करतात. हॉटेलसाठी दोन दिवसांपूर्वी माल भरला होता. शनिवारी हॉटेल बंद करून ते गेले होते. दत्ता परीट व त्यांची पत्नी शेजारील पत्राशेड घराबाहेर झोपले होते.
रविवारी पहाटे ४ वाजता अचानक हॉटेल व पाठीमागील खोलीला आग लागली. पहाटे वारा असल्याने काही कळायच्या आत आग भडकली. त्यामुळे आग विझविता आली नाही.
आगीत रोख रक्कम, संसारोपयोगी साहित्य, गॅस, फ्रीज, कपाट, भांडी, धान्य, हॉटेलचे साहित्य जळून अडीच लाखाचे नुकसान झाले.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी तलाठी दीपक ठाकरे यांनी पाहणी केली. पोलीसपाटील श्रीहरी पाटील, सरपंच पुंडलिक कांबळे, तलाठी दीपक ठाकरे, उपसरपंच शंकर सावंत यांच्या उपस्थितीमध्ये पंचनामा केला. आगीत हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे. व्यवसाय उभारण्यासाठी मदतीची गरज आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाकडून मिळावी, अशी मागणी दत्ता परीट यांनी केली.