अशोक पाटील-- इस्लामपूर यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखान्याची खरी परिस्थिती २६ सप्टेंबररोजी होणाऱ्या वार्षिक सभेतच स्पष्ट होईल. त्यानंतरच कारखान्यावर भाष्य करू, असे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. निवडणुकीत माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांनी कारखाना सुस्थितीत असल्याचा जाहीरनामा प्रसिध्द केला होता. सहकार पॅनेलचे डॉ. सुरेश भोसले आणि त्यांचे चिरंजीव डॉ. अतुल भोसले यांनी कारखाना मोडीत निघाल्याचा आरोप केला होता, तर आपण वर्षभरात सभासदांशी संपर्क साधून कारखान्याच्या स्थितीबाबत माहिती देऊन निवडणुकीच्या मैदानात उतरलो होतो. परंतु सभासदांनी सहकार पॅनेलला विजयी करून कारखाना त्यांच्या ताब्यात दिला असे डॉ. मोहिते म्हणाले. डॉ. मोहिते म्हणाले की, शासनाने सुचविलेल्या कर्मचारी पॅटर्नपेक्षा कारखान्यात अविनाश मोहिते यांनी अडीचपट जादा कामगार भरती केली होती. त्यावर नियंत्रण आणण्यासाठीच अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी अतिरिक्त कामगारांंच्या कपातीचा कटू निर्णय घेतला आहे. येणाऱ्या काळात ‘कृष्णा’चे हित व सभासदांना दर असेच हिताचे निर्णय सत्ताधाऱ्यांनी घेतल्यास त्याला आपला पाठिंबा राहील. २६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या वार्षिक सभेत खरी परिस्थिती समोर येणार आहे. शेवटी कर्जबाजारी कारखान्याचा फटका सभासदांनाच बसणार आहे. सध्या डॉ. भोसले सहकारी संस्थेकडून ठेवी गोळा करत आहेत. असे बँकिंग धोरण सहकारी कारखान्यात आणल्याने याचा फटका कारखान्यालाच बसणार आहे. या धोरणाविषयी त्यांनी शासनाकडून परवानगी घेणे गरजेचे आहे. ही परवानगी त्यांनी घेतली की नाही, याबाबत संदिग्धता आहे.सध्या साखर उद्योगावर मोठे संकट आहे. केंद्र व राज्य शासनाने साखर कारखान्याच्या हिताचे कोणतेही निर्णय घेतले नाहीत. त्यामुळे येणाऱ्या हंगामातही उसाला चांगला दर देणे साखर कारखान्यांना परवडणार नाही. याचा सारासार विचार सत्ताधाऱ्यांनी न केल्यास आगामी काळात कृष्णा कारखाना चालविणे अडचणीचे बनणार आहे, असे ते म्हणाले.पदासाठी इच्छुक नाही कृष्णा कारखान्याचा अभ्यास असणारे माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते यांची सल्लागार संचालकपदी निवड होणार असल्याच्या वावड्या उठल्या आहेत. याबाबत त्यांना छेडले असता, आपण या पदासाठी इच्छुक नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
‘कृष्णा’ची आर्थिक स्थिती लवकरच कळेल
By admin | Updated: September 18, 2015 00:07 IST