मिरज : म्हैसाळ, ताकारी सिंचन योजनांच्या जुन्या ३५ कोटींच्या वसुलीला तात्पुरती स्थगिती देऊ. मात्र, म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरू करण्यासाठी शेतकऱ्यांनी महिन्याला पाच कोटी रुपये आगाऊ पाणी बिल भरलेच पाहिजे, असे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले. म्हैसाळ, ताकारीबाबत शनिवारी मिरजेत झालेल्या आढावा बैठकीत टंचाई निधीतून पाणी सोडण्याच्या आ. जयंत पाटील यांच्या मागणीस मंत्री शिवतारे यांनी नकार दिला. ताकारी, म्हैसाळ योजनांसंदर्भात मिरजेत आयोजित बैठकीस आ. जयंत पाटील, आ. सुमन पाटील, आ. सुरेश खाडे, आ. अनिल बाबर, आ. शिवाजीराव नाईक, जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांच्यासह पाटबंधारे विभागाचे अधिकारी उपस्थित होते. ताकारी योजनेचे पाणी बिल जमा आहे. मात्र, म्हैसाळ योजनेचे १४ कोटी वीज बिल थकीत असल्याने आवर्तन सुरू झालेले नाही. यापूर्वी टंचाई निधीतून म्हैसाळ योजनेतून पाणी सोडण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सद्य:स्थितीत म्हैसाळचे पाणी सोडण्याची मागणी आ. जयंत पाटील यांनी केली. त्यावर मंत्री शिवतारे म्हणाले की, म्हैसाळ योजनेची थकबाकी शेतक ऱ्यांनी वापरलेल्या पाण्याचीच आहे. आता सद्य:स्थितीत जुन्या थकबाकी वसुलीला तात्पुरती स्थगिती देऊ. मात्र, म्हैसाळचे पाणी सोडण्यासाठी दरमहा पाच कोटी आगाऊ भरणे आवश्यक आहे. प्रत्येक महिन्यात पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांनी पाच कोटी रुपये भरावेत. ही रक्कम जुन्या थकबाकीपोटी वसूल केली जाणार नाही. टंचाई परिस्थितीमुळे एप्रिल व आॅगस्ट महिन्यात ‘म्हैसाळ’ची दोन आवर्तने सुरू केली. मात्र, त्यांच्याही बिलाची रक्कम थकीत आहे. त्यामुळे वीज बिल व देखभाल खर्चाएवढे पैसे भरा, नंतरच म्हैसाळचे पाणी सोडता येईल, असे शिवतारे यांनी स्पष्ट केले. (वार्ताहर) थकबाकी वापरलेल्या पाण्याची आमच्या काळात दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्यात आले होते, असे आ. जयंत पाटील यांनी सांगितले. त्यावर ‘पाणी योजनांची थकबाकी तुमच्याच काळातील आहे. टंचाई काळात सोडलेल्या पाण्याची नव्हे, तर टंचाई नसताना वापरलेल्या पाण्याची थकबाकी भरावी लागेल’, असे मंत्री शिवतारे यांनी सांगितले.
पाच कोटी भरा, मगच म्हैसाळचे पाणी
By admin | Updated: January 17, 2016 00:37 IST