सांगली : घरासमोर वायर पेटविल्याच्या कारणावरून दोन गटांत मारामारी झाली. ही घटना साखर कारखाना परिसरातील मुजावर बॅरेल गोडावूनजवळ सोमवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. या प्रकरणी दोन्ही गटांतील १४ जणांवर संजयनगर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उमेश वसंत पाटील (वय ३७) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार विजय जाधव, किरण जाधव (रा. लक्ष्मीनगर) यांच्यासह सहा ते सात जणांवर गुन्हा दाखल केला आहे. उमेश पाटील हे माधवनगर येथे जात असताना विजय जाधव याने त्याला बोलावून वायर घरासमोरच पेटविणार आहे. तुला त्रास होत असेल तर घर सोडून जा, असे म्हणून पाटील यांना लाथांनी मारहाण केली. यावेळी भंगार दुकानातील दोघे व अनोळखी पाच ते सहा जणांनीही मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यातील एकाने पाठीवर हत्याराने मारून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
तर विजय जाधव (३३, लक्ष्मीनगर) याने दिलेल्या फिर्यादीनुसार उमेश पाटील, त्यांचा भाऊ, पुतण्या, लहू गोसावी, केतन गोसावी (रा. रविवार पेठ), विक्रांत शिंदे (रा. माधवनगर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. घराजवळ वायर जळून घाण का केलीस, असे म्हणून उमेश पाटील व इतरांनी लाथांनी मारहाण करून प्लास्टिक पाईने तोंडावर मारून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.