१) रात्री तो असा कपाटावरतीच विराजमान होतो.
२) लहान मुलांच्या अंगावरती असा बागडतो.
निवास पवार
शिरटे : भरऊन्हात नाल्यात तडफडत पडलेला पोपट... त्याला घरी आणून पाणी पाजले. स्वच्छ धुऊन जखमा झालेल्या ठिकाणी औषधोपचार केले. खाऊ घातले. काही तासांनंतर तरतरीत झाल्यानंतर अंगणात त्याला सोडून देण्यात आले. आश्चर्य म्हणजे तो पोपट सायंकाळी थेट घरातच येऊन विराजमान झाला. तब्बल गेल्या महिनाभरापासून तो या कुटुंबाचा सदस्यच बनून गेला आहे. पोपटाच्या या अद्भुत जिव्हाळ्याची कहाणी सर्वांना अचंबित करणारी ठरली आहे.
ही घटना आहे येडेमच्छींद्र (ता.वाळवा) येथील. व्यवसायाने शिक्षक असणारे प्रताप संपतराव पाटील हे गावातून घरी येत असताना एका दुकानाजवळ नाल्यात एक पोपट तडफडत असताना दिसला. भाेवतीने दोन-तीन मांजरे घुटमळत होती. त्यांनी मांजरांना हाकलून नाल्यातील पोपट वर काढला. घरी नेऊन पहिल्यांदा पाणी पाजले. त्यानंतर स्वच्छ धुऊन त्याच्यावर औषधोपचार करून त्याला खाऊ घातले.
तरतरीत झाल्यानंतर त्याला अंगणात सोडण्यात आले. परंतु तो तेथेच घुटमळत राहिला. घरातील सर्वच जण आपल्या कामात व्यस्त. आश्चर्य म्हणजे सायंकाळी तो पोपट थेट घरात घुसला. आज जवळपास एक महिना होऊन गेला आहे. तरीही पोपटाने घर सोडलेले नाही. घरातील मुलांचा त्याला जिव्हाळा लागला आहे. दिवसभर इकडेतिकडे बागडतो. सायंकाळी मुलांच्या अंगाखाद्यावर बागडतो.
जसा पोपटाला घरातील मंडळींचा लळा लागला आहे, तसाच लळा आता घरातील प्रत्येकाला लागला आहे. ना बंदिस्त... ना पिंजरा. त्याच्या मनात आले तर तो कधीही उडून जाऊ शकतो. परंतु आपण म्हणतोना अडचणीत असताना एखाद्या व्यक्तीने केलेली मदत ही आयुष्यभर स्मरणात राहते. त्या व्यक्तीबद्दल आपसूकच मैत्री निर्माण होते. जसे मानवाचे वर्तन तसेच प्राण्यांचेही असते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. अशीच घटना येडेमच्छींद्र येथील या कुटुंबात घडली आहे असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
कोट
भरऊन्हात तडफडणाऱ्या पोपटाचा जीव वाचवून त्याला अंगणात सोडून दिले. परंतु सायंकाळी तो परत घरी आला. त्याने आम्हाला असा लळा लावला आहे की तो आमच्या कुटुंबाचा सदस्यच बनला आहे.
- प्रताप संपतराव पाटील, येडेमच्छींद्र