अशोक पाटील - इस्लामपूर बाजार समितीची निवडणूक चुरशीची होणार, असाच रंग होता. परंतु आमदार जयंत पाटील यांच्या विरोधकांचा धुव्वा उडाला. सध्या मात्र सभापती निवडीसाठी जोरदार फिल्डिंग लागली असून दोन्ही गटातील संचालकांनी या पदासाठी दावा केला आहे. अंतिम टप्प्यात जयंत पाटील, विलासराव शिंदे आणि मानसिंगराव नाईक हे एकत्रित बसून यावर तोडगा काढणार आहेत. इस्लामपूर व तासगाव बाजार समितीच्या निवडणुकीने सर्व जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले होते. इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत जयंत पाटील यांच्या राजारामबापू शेतकरी विकास पॅनेल विरुध्द सर्वपक्षीय विरोधकांनी ताकद एकवटली होती. त्यामुळे विरोधकांच्या पदरात काही जागा पडतील असा अंदाज होता. परंतु मतदारांनी तो फोल ठरवला व बाजार समितीची एकहाती सत्ता राष्ट्रवादीच्या ताब्यात दिली.निवडून आलेल्या संचालकांमध्ये आमदार जयंत पाटील आणि माजी आमदार विलासराव शिंदे यांचे समर्थक आहेत. यामुळे दोन्ही गटाच्या संचालकांनी आता सभापतीपद मिळविण्यासाठी आतापासूनच फिल्डिंग लावली आहे. याबाबत जयंत पाटील गटाचे संचालक दिलीप देसाई यांच्याशी संपर्क साधला असता, आपण सभापती पदासाठी इच्छुक आहे. जयंत पाटील यांचे नेतृत्व मानून कृषी उत्पन्न बाजार समितीत दीड वर्ष सभापतीपद सांभाळले. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न केले आहेत. माझा अनुभव पाहता, मलाच जयंत पाटील सभापती पदाची संधी देतील, अशी आशा आहे असे ते म्हणाले.विलासराव शिंदे गटाचे संचालक व विद्यमान सभापती आनंदराव पाटील हे साखराळे गावचे आहेत. प्रत्येक निवडणुकीत या गावातून जयंत पाटील यांना नेहमीच मतांचे अधिक्य मिळते. त्यामुळेच जयंत पाटील या गावाला नेहमीच झुकते माप देत आले आहेत. कारखान्याचे उपाध्यक्ष विजय पाटील हेही याच गावचे आहेत. पंचायत समितीचे सभापतीपदही या गावाला मिळाले होते. आनंदराव पाटील हे विलासराव शिंदे गटाचे असले तरी, जयंत पाटील यांच्या मतदार संघातील आहेत. त्यामुळे त्यांनी सभापती पदावर पुन्हा दावा केला आहे.दरम्यान, शिंदे गटाचेच कणेगाव येथील अॅड. विश्वासराव पाटील यांची दुसऱ्यांदा बाजार समितीवर निवड झाली आहे. त्यांनी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक पदासाठीही फिल्डिंग लावली होती. परंतु त्यांना थांबविण्यात आले. कणेगावातील ग्रामपंचायतीवर त्यांची सत्ता आहे. पाटील हे जयंत पाटील, विलासराव शिंदे आणि मानसिंगराव नाईक या तिघांनाही मानतात. त्यामुळे सभापती पदावर माझीच निवड होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.चमत्काराची शक्यता...सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपद निवडीवेळी अनेक ज्येष्ठ व माजी अध्यक्षांनी या पदावर दावा केला होता. परंतु जयंत पाटील यांनी ज्येष्ठ परंतु बँकिंग क्षेत्रात नवखे असलेले दिलीपराव पाटील यांना संधी देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यामुळे आता इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती निवडीतही असाच चमत्कार घडण्याची शक्यता आहे.वाळवा तालुक्यात जयंत पाटील आणि विलासराव शिंदे यांचे गट असले तरी, राजकीय निर्णयात दोघेही एकत्र बसून निर्णय घेतात. सभापती व उपसभापती पदाची निवडही दोघे मिळूनच जाहीर करणार आहेत.
इस्लामपुरात सभापती पदासाठी फिल्डिंग
By admin | Updated: August 4, 2015 00:10 IST