मिरज : मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेसमध्ये धावत्या रेल्वेतच महिलेची प्रसुती झाली. महिला बोगीतून प्रवास करणाऱ्या रूपाली नामक २७ वर्षीय गर्भवतीस आज सकाळी भिलवडीजवळ रेल्वे आली असता, अचानक प्रसुती कळा सुरू झाल्याने बोगीतील सहप्रवासी महिलांनी प्रसंगावधान राखून तिची प्रसुती केली. धावत्या रेल्वेतच महिलेस पुत्र झाला. पुणे येथील विवाहिता प्रसुतीसाठी मिरजेला येण्यासाठी सह्याद्री एक्स्प्रेसने एकटीच प्रवास करीत होती. पहाटे भिलवडीजवळ रेल्वे आल्यानंतर तिला अचानक प्रसुतीकळा सुरू झाल्या. यामुळे भांबावलेल्या सहप्रवासी महिलांनी रेल्वे डॉक्टरांबाबत चौकशी केली असता, रेल्वे डॉक्टर मिरजेत उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले. महिलांनी आणीबाणीच्या या परिस्थितीत धावत्या रेल्वेतच महिलेची प्रसुती करण्याचा निर्णय घेतला. महिला प्रवाशांच्या मदतीने सुखरूप प्रसुती होऊन नवजात अर्भकाच्या रडण्याने सर्वांना दिलासा मिळाला. प्रवासातच पुत्ररत्न झाल्याचे पाहून मिरज स्थानकात आलेल्या विवाहितेच्या कुटुंबियांना आश्चर्याचा धक्का बसला. (वार्ताहर)
धावत्या रेलमध्ये महिलेची प्रसुती
By admin | Updated: September 13, 2015 22:35 IST