मिरज : मिरजेत १५ लाख कर्जापोटी ५४ लाख वसूल करून आणखी ८० लाखांची मागणी करून धमकावल्याबद्दल राजू ऊर्फ रियाज गुलाब बागवान ( रा. शंभर फुटी रोड, मिरज) या सावकारास न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडी दिली.
माजी आमदार हाफिज धत्तुरे यांचे जावई अकबर मोमीन यांनी व्यवसायासाठी पाच वर्षांपूर्वी राजू बागवान याच्याकडून १५ लाख रुपये दरमहा पाच टक्के व्याजाने घेतले होते. मोमीन यांनी पाच वर्षांत बागवान यास वेळोवेळी ५४ लाख रुपये परत दिले. मात्र, त्यानंतरही राजू बागवान याने तुम्ही वेळेवर पैसे दिले नसल्याने दंड व्याजासह आणखी ८० लाखांची मागणी केली. पैशांच्या वसुलीसाठी बागवान हा मोमीन यांची मालमत्ता नावावर करून देण्यासाठी धमकावत असल्याची मोमीन यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी गांधी चाैक पोलिसांनी खासगी सावकारी व घरात घुसून धमकावल्याबद्दल पोलिसांनी राजू बागवान यास अटक करून मिरज न्यायालयात हजर केले. न्यायालयाने बागवान यास पाच दिवस पोलीस कोठडी दिली असून पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कचरे अधिक तपास करत आहेत.