सांगली : सांगोला तालुक्यात मृतावस्थेत सापडलेल्या तरुणाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले आहे. विजय विकास पवार (वय २१) असे त्याचे नाव असून त्याचा वडिलांनीच खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. याप्रकरणी वडील विकास बाबू पवार ( वय ४५) आणि त्याचा साथीदार उत्तम मदने (वय २८, रा. कोळे, ता. सांगोला) याला सांगली ग्रामीण पोलिसांनी अटक केली.
आई-वडिलांना सतत त्रास देतो म्हणून विजयचा खून झाल्याचेही पोलीस तपासात स्पष्ट झाले आहे. सांगोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुद्धेहाळ तलावामध्ये १५ जुलै रोजी अनोळखी तरुणाचा मृतदेह सापडला होता. मृतदेहाला शिर नसल्याने ओळख पटविण्यात अडचणी येत होत्या. चटई व शेडनेटच्या कापडात मृतदेह गुंडाळला होता. मोठा दगडाला बांधून तलावात फेकण्यात आला होता. सांगोला पोलिसांनी खुनाचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला होता. विविध पोलीस ठाण्यांतील बेपत्ताच्या नोंदी तपासल्या जात होत्या.
यादरम्यान कवलापुरातून एक जण बेपत्ता असल्याची माहिती सांगली ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत निशाणदार यांना मिळाली. तरुणाचे नाव विजय पवार असल्याचेही समजले. पोलिसांनी पवार कुटुंबीयांकडे चौकशी केली, तेव्हा उडवाउडवीची उत्तरे मिळाली. त्यामुळे विकासला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली, त्यावेळी त्याने खुनाची कबुली दिली. मृत विजय हा आपला मुलगा असल्याचे सांगितले. पत्नीला व मला सतत त्रास देत असल्याने कंटाळून साथीदाराच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली. ओळख पटू नये म्हणून मृतदेह शिर कापून तलावात टाकल्याचेही सांगितले. पोलिसांनी दोघा संशयितांना सांगोला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, उपाधीक्षक अजितकुमार टिके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक निशाणदार, बाळकृष्ण गायकवाड, रमेश कोळी, कपिल साळुंखे, महेश जाधव, आकाश गायकवाड आदींनी खुनाचा तपास केला.