भवानीनगर (ता. वाळवा) येथे गणेशखिंड (चिंचणी)कडे जाणाऱ्या येथील रस्त्यावर भुयारी मार्ग होण्याची मागणी आहे.
निवास पवार
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरटे : भवानीनगर (ता. वाळवा) येथील रेल्वे भुयारी मार्गास २०१८ मध्ये रेल्वे मंत्रालयाने येणारा खर्च राज्य शासनावर सोपवीत तत्वत: मान्यता दिली होती. या कामासाठी तत्कालीन भाजपा सरकारने ३ कोटी ८० लाख ३२ हजार रुपयाची अर्थसंकल्पात तरतूद करूनही हा प्रश्न सुटलेला नाही. रेल्वेच्या दुहेरी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यामुळे भुयारी मार्गाचाही प्रश्न सुटावा यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी जोर धरला आहे.
भवानीनगर - गणेशखिंड (चिंचणी) कडे जाणाऱ्या रेल्वे भुयारी मार्गाचा प्रश्न गेल्या ६० वर्षांपासून लोंबकळत पडला आहे. यासाठी अनेकवेळा आंदोलने, रास्तारोको, रेलरोको झाले आहेत. परंतु गावकऱ्यांना आश्वासनाशिवाय काहीच मिळालेले नव्हते. फेब्रुवारी २०१८ मध्ये तत्कालीन कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत भाेसले-पाटील, रेल्वे गेट समितीचे अध्यक्ष रघुनाथ मोहिते, माजी सरपंच धनजंय रसाळ यांच्या शिष्टमंडळाने दिल्ली येथे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचेशी चर्चा केली असता या कामाचा खर्च राज्य शासनाने करावा असे सांगत रेल्वे मंत्रालयाने या कामास तत्वत: मान्यता दिली होती.
रेल्वे विभागाने भवानीनगर व ताकारी येथे सर्व्हे करून ७ कोटी रुपयाचे अंदाजपत्रक तयार केले. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी यामध्ये लक्ष घालीत २०१९-२० या वित्तीय वर्षातील अंदाजपत्रकात ताकारीला ४ कोटी व भवानीनगरसाठी ३ कोटी ८० लाख ३२ हजार रुपयांची तरतूद केली होती. त्यामुळे भुयारी रस्त्याचा प्रश्न कायमचाच निकालात निघेल, अशी अपेक्षा गावकऱ्यांना होती. रेल्वेच्या दुहेरी मार्गाचे काम अंतिम टप्प्यात आले तरी भुयारी मार्गाचा प्रश्न अजूनही जैसे थेच आहे.
सध्याचा भुयारी मार्ग हा पावसाचे किंवा इतर पाणी जाण्यासाठी आहे लोकांची किंवा वाहनांची ये-जा करण्यासाठी नाही असे पत्र नुकतेच रेल्वे प्रशासनाने ग्रामपंचायतीस दिले आहे. तसेच त्यामध्ये भवानीनगर ते गणेशखिंड (चिंचणी) रेल्वे हद्दीतील भुयारी रस्ता हवा असेल तर कार्यक्षेत्रातील आमदार, खासदार यांच्याशी पत्रव्यवहार करून व त्यांच्या सहकार्यातूनच हा प्रश्न सुटू शकेल असे नमूद केले आहे. त्यामुळे भुयारी मार्ग होणार की ते स्वप्नवतच राहणार हे येणारा काळच ठरवेल.
चौकट
ज्येष्ठ नागरिकांचे आजपासून उपोषण
भवानीनगर ते गणेशखिंड (चिंचणी) रस्त्यावरील रेल्वे हद्दीतील प्रस्तावित अंडरग्राऊंड रस्त्यासाठी अर्थक्रांती नागरिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ मोरे-पाटील (रेठरे हरणाक्ष), उपाध्यक्ष नारायण सावंत (बिचूद), कडेगाव तालुकाध्यक्ष विठ्ठलराव पाटील (सोनकिरे), वाळवा तालुकाध्यक्ष अशोकराव गोडसे हे भवानीनगर ग्रामपंचायत कार्यालयासमोर आज सोमवार दि. ५ पासून उपोषणास बसणार आहेत.