इस्लामपूर : ऊस मजूर पुरविण्याच्या नावाखाली बीड जिल्ह्यातील काळेगाव हवेलीच्या रामनगर तांड्यावरील एका मुकादमाने फार्णेवाडी-बोरगाव येथील शेतकऱ्यास ८ लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली. या मुकादमाविरुद्ध शुक्रवारी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मोहन मधुकर फार्णे (वय ३५, रा. फार्णेवाडी) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बाबूराव गेणू पवार या मुकादमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. फसवणुकीचा हा प्रकार जून ते ऑक्टोबर २०१८ या कालावधीत घडला आहे. फार्णे यांच्याकडून ऊस तोडणीकरिता मजूर पुरविण्याचा करार करून बाबूराव पवार याने ११ लाख ५५ हजार रुपयांची रक्कम घेतली होती. २०१८-१९ च्या हंगामात त्याने केलेल्या कामाचा हिशेब केला असता, त्याच्या मजुरीची रक्कम ३ लाख ४६ हजार रुपये झाली होती. ही रक्कम वजा करता ८ लाख ९ हजार रुपयांची रक्कम संशयित बाबूूराव पवार फार्णे यांना देणे लागत आहे. त्याबद्दल पवार याने धनादेश दिला होता, मात्र तो वठल्याने ही रक्कम रोख देण्याचे पवार याने कबूल केले होते. तरीसुद्धा हे पैसे देण्यास पवार हा टाळाटाळ करू लागल्याने फार्णे यांनी त्याच्याविरोधात फसवणुकीची फिर्याद दिली. पोलीस उपनिरीक्षक समाधान लवटे अधिक तपास करीत आहेत.