लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी तालुका कृषी विभागाकडून आत्मा योजनेंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, तसेच शेतकरी गटांची स्थापना करून प्रगती साधावी, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
येथील प्रशासकीय इमारतीत तालुका शेतकरी सल्लागार समितीची आढावा बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी तहसीलदार गणेश शिंदे यांची प्रमुख उपस्थिती हाेती. नाईक म्हणाले, तालुक्यात शेतकरी बचत गट तयार करावेत. नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून उत्पन्न कसे वाढवता येईल, हे पाहावे. पीक स्पर्धेमध्ये शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा. कोविड काळात शेतीचे महत्त्व पटले आहे. भविष्यकाळात शेतीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणार आहे. शेती व्यवसाय फायदेशीर करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. दर्जेदार निरोगी बियाणांचा वापर, सेंद्रिय खते व औषधांचा वापर करून आरोग्यासाठी पोषक अन्नधान्य, भाजीपाला व फळांचे उत्पादन घेणे सदृढ आरोग्यासाठी गरजेचे आहे.
प्रारंभी तालुका कृषी अधिकारी जी.एस. पाटील यांनी पीकस्पर्धा व आत्मा योजनेची माहिती दिली. पंचायत समिती सदस्य मनिषा गुरव, सहायक गट विकास अधिकारी अरविंद माने, तालुका कृषी अधिकारी जी.एस. पाटील, मंडळ कृषी अधिकारी, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक व सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक उपस्थित होते.
चाैकट
सल्लागार समितीचे पदाधिकारी
अध्यक्ष राजेंद्र दशवंत, सदस्य गजानन पाटील, मनीषा गुरव, संचित देसाई, रेश्मा बेंगडे, सुवर्णा भालेकर, जयश्री खिलारे, मनीषा नायकवडी, रूपाली नलवडे, भगवान पाटील, नीलेश काटके, मंदाकिनी पाटील, वंदना खोत, बाबासाहेब पाटील, अरविंद माळी, सदाशिव नावडे, मधुकर पाटील, श्रीकृष्ण सावंत, कृष्णा माने, वैशाली माने, प्रचिती सहकारी खरेदी-विक्री संघाचे सचिव व सह्याद्री सहकारी खरेदी-विक्री संघाचे सचिव.