सांगली : शेतकऱ्यांच्या पिकांची उताऱ्यावर नोंदीसाठी राज्य शासनाने सुरू केलेल्या ई-पीक नोंदणीस जिल्ह्यातून प्रतिसाद मिळतो आहे. स्वातंत्र्यदिनापासून सुरू झालेल्या या अभियानात १५ सप्टेंबरपर्यंत शेतकरीच आपल्या मोबाईलचा वापर करून पिकांची नोंद करणार आहेत. महसूल व कृषी विभागाचे कर्मचारी यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना प्रशिक्षण देत आहेत.
१५ ऑगस्टपासून ई-पीक नाेंदणीसाठीच्या मोबाईल ॲपचे लाेकार्पण करण्यात आले. त्या अगोदरच याची चाचणी सुरू करण्यात आली होती. राज्यभरातूनच यास चांगला प्रतिसाद मिळतो आहे. जिल्ह्यात कृषी सहायक व तलाठ्यांकडून थेट शेतकऱ्यांना याची माहिती दिली जात आहे. कितीही ग्रामीण भाग असला तरी आता प्रत्येक कुटुंबात एकतरी स्मार्टफोन असताेच. त्यामुळे या अभियानास गती मिळाली आहे.
यापूर्वी सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंद करण्यासाठी शेतकऱ्यांना तलाठी, कोतवाल आणि चावडीची फेरी मारावी लागत असे. त्यात अनेकवेळा पिकांची नाेंद न झाल्याने पीककर्जासह नुकसानभरपाईची वेळ आल्यास त्यातही अडचणी येत होत्या. यावर सक्षम पर्याय म्हणून आता शासनाने स्वत: शेतकऱ्यांनीच फोटो काढून नोंदीसाठी ॲप तयार केले आहे. हे ॲप अगदी कमी शिक्षण झालेल्या शेतकऱ्यांनाही सुलभपणे चालविता येऊ शकते.
चौकट
५८० पिकांची होऊ शकणार नोंद
शासनाने ॲप विकसित करताना त्यात पिकांची नावे समाविष्ट केली आहेत. सध्या २५४ पिकांची नोंद याद्वारे होऊ शकते. यात धान्ये, कडधान्ये, तेलबिया, भाजीपाला, फळे, पॉलिहाऊसमधील पिके, औषधी वनस्पती, आदींचा समावेश आहे. लवकरच यात ५८० पिकांची नोंदी घेण्याची सोय सुरू होणार आहे. जिल्ह्यात २० हून अधिक पिकांची नोंद शेतकऱ्यांकडून होत आहे.