वांगी : सात-बारा, खातेउताऱ्यासाठी शेतकऱ्यांना तलाठी कार्यालयास हेलपाटे घालावे लागत आहेत. कोरोनामुळे भाजीपाला, फळ पिकांना दर न मिळाल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी शेतकरी विकास सोसायटी, बॅंकामधून कर्ज घेत आहेत. मात्र यासाठी लागणारे सात-बारा व खातेउतारा वेळेत मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी अडचण हाेत आहे.
तालुक्यात सर्वात जास्त सुमारे ३६०५ हेक्टर क्षेत्र असणाऱ्या वांगी (ता. कडेगाव) परिसरात आरफळ व ताकारी योजनेच्या पाण्याने सुबत्ता आली असली, तरी गेल्या दोन वर्षापासून कोरोनामुळे भाजीपाला, द्राक्षे यासह अन्य पिकांना दर नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. खताचे दर वाढले आहेत. कृषी दुकानदार लागवड, औषधे उधार देत नाहीत. त्यामुळे शेतकरी सोसायटी व बँकेकडून कर्ज घेत आहेत. मात्र कर्जासाठी लागणारे सात-बारा, खाते उतारे तलाठी कार्यालयातून चार चार दिवस हेलपाटे घालूनही मिळत नाहीत.
तलाठी कार्यालयात शेतकरी उताऱ्यासाठी गेल्यास नेट नाही, ऑपरेटर नाही, तलाठ्याची सही नाही, तलाठी बैठकीला गेले आहेत. अशी कारणे देऊन शेतकऱ्यांना परत पाठवले जाते. उतारे वेळेत न मिळाल्यामुळे कर्ज वेळेत मिळत नाही. शेतीला औषधे व खते वेळेतच द्यावी लागतात. महसूलमधील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याप्रश्नी लक्ष घालून संबधित तलाठ्यांवर कारवाई करून शेतकऱ्यांचे हेलपाटे थांबवावेत, अशी मागणी हाेत आहे.
चौकट
वांगीला दोन तलाठ्यांची नियुक्ती करण्याची मागणी
वांगी गावाचे क्षेत्र जास्त आहे. शासनाने वांगी भाग १ व वांगी भाग २ असे दोन तलाठी सजा मंजूर केले आहेत. असे असताना गावात फक्त एकच तलाठी काम करीत आहे. तोही वाळूचोरी, पंचनामे आदी कामात असल्यामुळे लोकांच्या ऑनलाईन चुकलेल्या नोंदी, ई-करार आदी कामे खोळंबली आहेत. यामुळे दुसऱ्या तलाठ्याची नियुक्ती तातडीने करावी, अशी मागणी हाेेत आहे.