जत : घोलेश्वर येथील शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला द्यावा, या मागणीसाठी घोलेश्वर येथील शेतकरी आमदार विक्रम सावंत यांच्या कार्यालयासमोर दि. १२ जुलै रोजी उपोषणाला बसण्याचा इशारा सलीम गवंडी यांनी दिला आहे.
म्हैशाळ टप्पा क्रमांक ६ मुख्य कालव्यासाठी जत तालुक्यातील घोलेश्वर येथील आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी मुख्य कालव्यामध्ये २००९ पासून अधिग्रहण केल्या आहेत. आजअखेर शेतकऱ्यांना या कालव्यामध्ये गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळाला नाही. या संदर्भात संबंधित पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांना भेटून व उपविभागीय अधिकारी यांच्या उपस्थितीत बैठक आयोजित केली होती. तरीसुद्धा या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला नसून, त्वरित मोबदला न दिल्यास १२ जुलै रोजी जत येथील बाजार समितीच्या आवारात आ. विक्रम सावंत यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा अल्पसंख्याक कल्याण समितीचे जिल्हा सदस्य सलीम गवंडी यांनी तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. संबंधित अधिकारी हे शेतकऱ्यांची क्रूर चेष्टा करत असून, गेल्या दहा ते बारा वर्षांपासून जमिनीचा मोबदला घेण्यासाठी शेतकऱ्यांना संघर्ष करावा लागत आहे. कालव्यामधून गावतळे भरण्यासाठी जे पाणी सोडण्यात आले, त्यामध्ये शेतकऱ्यांची जमिनीची माती वाहून जात आहे. यामुळे जमिनीचे नुकसान होत आहे.