लोकमत न्यूज नेटवर्क
मांगले : देववाडी (ता. शिराळा) येथील भरत शंकर गोसावी (वय ४५) या शेतकऱ्यांचा वारणा नदीच्या पुरात बुडून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी दुपारी उघडकीस आली. देववाडी- ठाणापुडेदरम्यान वारणेच्या पुराचे पाणी आलेल्या ओढ्यावरील रस्त्यावरून गाेसावी जनावरांसाठी वैरण आणण्यासाठी गेले हाेते.
देववाडी येथील भरत शंकर गोसावी यांचे घर पुराचे पाणी शिरल्यामुळे पडले आहे. त्यांच्या कुटुंबाला शुक्रवारी जनावरांसह मांगले येथे सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले होते. पुराचे पाणी कमी झाल्यानंतर ते सोमवारी देववाडीत आले होते. घराची पडझड झाल्यामुळे ते प्राथमिक शाळेत राहिले होते. त्यांची जनावरेही शाळेच्या आवारात बांधली होती. या जनावरांना चारा आणण्यासाठी ते मंगळवारी सकाळी गेले होते. मात्र, परतताना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाण्यात वाहून गेले. ते घरी न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. मात्र, दुपारी त्यांचा मृतदेह देववाडी- ठाणापुडे रस्तावरील ओढ्यात वारणेच्या पुराच्या पाण्यात दृष्टीस पडला. ताे पाण्याबाहेर काढून शिराळा उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणी करण्यात आली. रात्री उशिरा त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. घटनेची नोंद शिराळा पोलीस ठाण्यात झाली आहे.