इस्लामपूर : शेत-शिवारात काबाडकष्ट करून पिकविलेल्या फळभाज्यांना दलालांनी कवडीमोल दर दिल्याने संतप्त झालेल्या आटपाडी-हिवतड येथील शेतकऱ्यांनी न्याय मागण्यासाठी आणि फळभाज्यांच्या भावाबाबत आवाज उठवावा हे सांगण्यासाठी पदरमोड करत आमदार सदाभाऊ खोत यांच्या निवासस्थानी धडक मारली. यावेळी त्यांनी सोबत भाज्यांचा क्रेट आणल्याने आंदोलनाची हूल उठली. त्यामुळे तेथे पोलिसांनी धाव घेतली. प्रत्यक्षात ते आंदोलन नव्हतेच.
ऋषीकेश साळुंखे, विजय कोरे, रवींद्र म्हमाणे, आशिष मेनकुदळे, दत्ता अनुसे हे हिवतड येथील शेतकरी खोत यांच्या निवासस्थानाजवळ सकाळी ११ च्या सुमारास आले होते. त्यांनी पिकविलेल्या ढबू मिरची, टोमॅटो या पिकांना दलालांकडून कवडीमोल दर दिला जात आहे. दोन-तीन रुपये किलोचा दर देऊन शेतकऱ्यांची पिळवणूक होत असल्याच्या रागातून हे शेतकरी ढबू मिरची आणि टोमॅटोचा क्रेट घेऊन आले होते.
यावेळी सागर खोत, मोहसीन पटवेकर व इतर कार्यकर्त्यांनी या शेतकऱ्यांची भेट घेऊन चर्चा केली. ऋषीकेश साळुंखे या शेतकऱ्याने मोबाईलवरून आमदार खोत यांच्याशी संवाद साधला. त्यांनी दलालांकडून होणाऱ्या पिळवणुकीकडे त्यांचे लक्ष वेधले. पीक घेऊनही वर आम्हालाच आर्थिक भुर्दंड बसत आहे. आमचे पीक आम्ही रस्त्याकडेला फेकून दिले आहे, अशी कैफियत मांडत तुम्ही यावर आवाज उठवावा हे सांगण्यासाठी आलो असल्याचे स्पष्ट केले. त्यावर खोत यांनी तुम्ही तयारी करा, चार दिवसांत यावर आंदोलन उभारू, असा शब्द दिला. यावेळी दोन अधिकारी व पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात होते.
कोट
हिवतड येथे उद्याच जाऊन तेथील शेतकऱ्यांशी भेटून परिस्थितीची माहिती घेणार आहे. दलालांकडून जर शेतकऱ्यांची पिळवणूक होत असेल, तर त्यांना सोडणार नाही. बळिराजाच्या घामाचा दाम मिळवून देऊ.
- सागर खोत
फोटो : ०५ इस्लामपूर २
ओळ : इस्लामपूर येथे आमदार सदाभाऊ खोत यांच्या निवासस्थानाजवळ हिवतड येथील शेतकऱ्यांनी ठिय्या मारला. यावेळी सागर खोत, ऋषीकेश साळुंखे, विजय कोरे, रवींद्र म्हमाणे उपस्थित होते.