टाकळी : शिपूर (ता. मिरज) येथील दिलीप शिवाजी भोसले (वय ४०) या शेतकऱ्याचा विजेचा धक्का बसून जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री दोनच्या सुमारास घडली. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसांत नोंद आहे.
दिलीप भोसले यांची डोंगरवाडी पोट कालव्यानजीक द्राक्ष बाग आहे. त्यांचा वडापचाही व्यवसाय आहे. वर्षभरापूर्वी त्यांनी द्राक्ष बाग लावली आहे. काही महिन्यांपूर्वी ते कुटुंबासह शेतात राहण्यास गेले आहेत. रात्री दोनच्या सुमारास वीज पुरवठा खंडित झाल्याने ते शेतातील मोटार पेटीत काही बिघाड झाले आहे का हे पाहण्यासाठी गेले असता त्यांना विजेचा तीव्र धक्का बसला. विजेचा धक्का बसून ते फेकले गेले व मागे असलेल्या दगडावर त्यांचे डोके आपटून त्यांचा जागीच मृत्यू झाला.
त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली असा परिवार आहे. याबाबत ग्रामस्थांत हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची वर्दी पोलीस पाटील राजेश कांबळे यांनी मिरज ग्रामीण पोलिसांत दिली आहे.