‘अन्न व औषध’ प्रशासनाच्या वर्षभरातील कारवाया बघितल्या तर सर्वाधिक कारवाया या दूध डेअरीवर करण्यात आल्या आहेत. अनेक दूध डेअरी चालकांकडून दुधात भेसळ हाेते, हे मान्य असले तरी प्रशासनाच्या कारवाईचा आलेख बघता दूध सोडून अन्य कोणत्याच पदार्थात भेसळ हाेत नाही, असेच दिसून येते. मिठाईवर कालमर्यादा देण्याच्या आदेशाला अनेक दुकानदार जुमानत नसतानाही त्यांच्यावर कारवाईसाठी हात आखडता घेतला जातो. त्याचवेळी दूध डेअरी मधील ‘मलई’ मात्र प्रशासनाच्या नजरेत येत असल्याचेच चित्र आहे.
चौकट
सणासुदीच्या पार्श्वभूमीवर जीवाशी खेळ नको
अवघ्या आठ दिवसांवर आलेला गणेशोत्सव व त्यानंतर लगेचच दसरा. दिवाळी सणात मिठाईसह अनेक खाद्यपदार्थातील भेसळ जीवघेणी ठरते. ‘अन्न व औषध’ने आता कोरोनाची मरगळ झटकून देत या भेसळखोरांवरही लगाम घालावा, अशीच अपेक्षा व्यक्त होत आहे.