लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : जिल्हा परिषद पदाधिकारी बदल करायचा आहे हे खरे आहे. पण, काही गडबड होणार नाही, याचीही खबरदारी घ्यावी, अशी सूचना भाजपचे नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार संजयकाका पाटील यांच्यासह भाजपच्या नाराज सदस्यांना दिली. मी जिल्ह्यातील नेत्यांना पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेण्याबाबत निरोप देतो, असेही फडणवीस यांनी इच्छुकांना आश्वासन दिले.
जिल्हा परिषदेत भाजप व मित्रपक्षांची सत्ता आहे. सव्वा वर्षांनंतर जिल्हा परिषदेतील विद्यमान पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेण्याचे निश्चित झाले होते. पण, दरम्यानच्या कालावधीत महापालिकेतील पदाधिकारी बदलामध्ये भाजपच्या हातून सत्ता गेल्यामुळे जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदलास भाजपच्या बहुतांशी नेत्यांचा विरोध आहे. यातूनच पदाधिकारी बदल लांबणीवर गेला होता. फडणवीस यांनीही भाजप नेते आणि सदस्यांची पंढरपूर येथेही एक बैठक घेऊन आढावा घेतला होता. त्यानंतर दुसरी बैठक मुंबई येथे मंगळवारी झाली आहे. या बैठकीस केवळ खासदार संजयकाका पाटील, जिल्हा परिषद सदस्य अरुण राजमाने, अरुण बालटे, सुरेंद्र वाळवेकर यांच्यासह सात सदस्य उपस्थित होते. या बैठकीमध्ये संजयकाका आणि नाराज सदस्यांची भूमिका फडणवीस यांनी जाणून घेतली. त्यानंतर पदाधिकारी बदलाबाबत मी भाजप जिल्हाध्यक्षांसह अन्य नेत्यांना निरोप देतो. पण, तुम्ही पदाधिकारी बदलामध्ये जिल्हा परिषदेतील भाजपची सत्ता जाणार नाही, याकडेही लक्ष दिले पाहिजे, अशी सूचनाही संजयकाकासह सदस्यांना दिली आहे.
चौकट
पदाधिकारी राजीनामे देणार का?
फडणवीस यांच्या सूचनेनुसार भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे खरंच राजीनामे घेतील का, असा प्रश्न चर्चेत आहे. पदाधिकाऱ्यांचे राजीनामे न घेण्याच्या भूमिकेचे देशमुख, माजी आ. विलासराव जगताप आहेत. यामुळे विद्यमान पदाधिकाऱ्यांचे राजीनामे घेण्याचे भाजपच्या नेत्यांसाठी डोकेदुखीच आहे.