आटपाडी : बनपुरी (ता. आटपाडी) येथील पुकळे वस्तीत काही दिवसांपासून सायंकाळी सात ते रात्री अडीच वाजेपर्यंत विठ्ठल पुकळे यांच्या घरावर दगड पडू लागले. विठ्ठल पुकळे हे व्यवसायानिमित्त पुण्याला. त्यांच्या आई, वडील, पत्नीची घाबरगुंडी. थोडा वेळ गेला की, पुन्हा घराच्या पत्र्यावर दगड पडणे सुरूच! वस्तीवर सर्वांचाच भीतीने थरकाप... भानामती, करणी, भुताटकीच्या चर्चांना ऊत... पण ‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांनी दगड टाकणाऱ्यांचे पितळ उघडे पाडले आणि या दुष्काळी भागातील एक कुटुंब एखाद्या भोंदू बाबाच्या आर्थिक आणि मानसिक लुटीपासून बचावले!विठ्ठल दामू पुकळे हे पुण्याला वाहन व्यवसायानिमित्त राहतात. त्यांच्या आईच्या पाठीच्या मणक्यावर शस्त्रक्रिया केल्याने आई-वडिलांची काळजी घेण्यासाठी त्यांनी पत्नी आणि छोट्या बाळाला बनपुरीत घरी ठेवले आहे. खरसुंडी रस्त्यावर बनपुरीतून सुमारे २ कि. मी. अंतरावर त्यांची वस्ती आहे. दि. २१ नोव्हेंबरपासून सायंकाळी सात ते रात्री अडीच वाजण्याच्या कालावधित त्यांच्या घराच्या पत्र्यावर दगड पडू लागले. त्यामुळे सगळ्या कुटुंबाची भीतीने गाळण उडाली. विठ्ठल यांच्या पत्नीने त्यांना सांगताच त्यांनी थेट पुण्यातील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला. नंतर आटपाडीच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधला.आटपाडीत येऊन पुकळे यांनी अंनिसचे जिल्हा खजिनदार सुनील भिंगे, आटपाडी शाखेचे कार्याध्यक्ष दीपक खरात, एन. डी. पिसे आणि जनता दलाचे तालुकाध्यक्ष आबा सरगर यांना घेऊन घर गाठले. अंनिसच्या कार्यकर्त्यांनी पाहणी केली. शेकडोंच्या संख्येने दगड पडले होते. दगड कोणत्या दिशेने येतात, केव्हा येतात, केवढ्या आकाराचे दगड पडतात? या सर्व माहितीचा आढावा घेतला. त्यानंतर कुटुंबातील प्रत्येकाशी संवाद साधला आणि परिसरातील सर्व ग्रामस्थांना एकत्रित बोलावून ठणकावून सांगितले. दगड ही निर्जिव वस्तू आहे. कुणीतरी उचलून टाकल्याशिवाय दगड आपोआप पडू शकत नाहीत. शासनाने जादू-टोणाविरोधी कायदा मंजूर केल्याने अशी फसवणूक करणाऱ्या व्यक्तींना अजामीनपात्र गुन्ह्याला आणि पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल. तुमच्यापैकीच कुणीतरी हे दगड टाकत आहेत. पुन्हा दगड पडला तर, आम्ही आमच्या पद्धतीने त्या व्यक्तीला शोधून काढू आणि त्याला कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देऊ, असा इशारा दिला. (वार्ताहर)ेसीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा इशारा‘अंनिस’च्या कार्यकर्त्यांना वस्तीवरीलच काहीजणांनी संशयास्पद माहिती दिली. रात्री स्पष्टपणे छायाचित्रण करणारे सीसीटीव्ही कॅमेरे वस्तीवर लावण्याचा इशाराही कार्यकर्त्यांनी ग्रामस्थांना दिला. या इशाऱ्यानंतर लगेचच काही संशयास्पद व्यक्तींनी तिथून काढता पाय घेतला. पुकळे यांच्या घरावर सलग चार दिवस दगड पडत होते. सोमवार, दि. २४ नोव्हेंबरपासून वारंवार अंनिसचे कार्यकर्ते तिथे जाऊन खात्री करत आहेत. त्या कुटुंबाला आधार देत आहेत. त्यानंतर मात्र एकही दगड पुकळे यांच्या घरावर पडलेला नाही.
दगडांच्या पावसाचा पर्दाफाश
By admin | Updated: December 2, 2014 00:15 IST