भोसे : मागील सहा महिन्यांपासून सर्व चाचण्या घेऊन पूर्ण तयार असलेली डोंगरवाडी उपसा सिंचन योजना, म्हैसाळ योजनेच्या थकबाकीमुळे अडचणीत सापडली आहे. भोसेसह मिरज पूर्व भागातील पंधरा गावांना वरदान ठरलेल्या डोंगरवाडी उपसा सिंचन योजनेतून उपसा कधी चालू होणार, याकडे जनता आशाळभूतपणे पाहात आहे. भोसे, सोनी, पाटगाव, करोली, सिद्धेवाडी, कळंबी, गुंडेवाडी आदी १५ गावांनी हक्काच्या पाण्यासाठी विविध पक्षांच्या माध्यमातून तसेच पक्षविरहितही आंदोलने केली. मागील १० वर्षातील आंदोलनांचे फलस्वरुप म्हणून डोंगरवाडी उपसा योजनेच्या कामास तीन वर्षापूर्वी गती आली. लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये या योजनेचा प्रश्न गाजला होता. थकित वीजबिले व पाणीपट्टीमुळे म्हैसाळ योजना सहा महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे म्हैसाळचीच उपयोजना असलेली डोंगरवाडी योजना उद्घाटनापूर्वीच अडचणीत आली आहे. अगोदरच दुष्काळ व अवकाळी पावसाच्या फटक्यात नुकसान झालेल्या बळीराजाला अद्याप शासनाची मदत मिळाली नसताना, म्हैसाळ योजनेवर अवलंबून असलेल्या मिरज, तासगाव, कवठेमहांकाळ, जत, मंगळवेढा, सांगोल्याचा काही भाग या दुष्काळी पट्ट्यातील बागायतदार, शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे. (वार्ताहर)योजना पूर्ण, मात्र लाभ नाहीच...म्हैसाळ योजना चालू होण्यासाठी लाभक्षेत्रातील किमान ७० टक्के शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज द्यावे लागणार आहेत. मात्र वारंवार आवाहन करूनही शेतकऱ्यांकडून पाणी मागणी अर्ज भरून देण्यास टाळाटाळ होत आहे. पाणी मागणी अर्ज येत नाहीत, तोपर्यंत म्हैसाळ योजना चालू होण्याची चिन्हे नाहीत. वारंवार आंदोलने केल्यानंतर ‘डोंगरवाडी’ योजना एकदाची पूर्ण झाली, मात्र शेतकरी अद्यापही लाभापासून वंचितच राहिले आहेत.
संपता संपेना ‘डोंगरवाडी’चा वनवास...
By admin | Updated: April 2, 2015 00:43 IST