लोकमत न्यूज नेटवर्क
नेलेॅ : स्वत:च्या मनावर विजय मिळवणे हे इतरांवर विजय मिळवण्यापेक्षा अधिक कठीण काम आहे. त्यामुळे सर्वात पहिल्यांदा स्वत:च्या मनावर विजय मिळवायला शिका, असा संदेश भगवान गौतम बुद्ध यांनी २,५०० वर्षांपूर्वी जगाला दिला, असे मत साईसम्राट इन्स्टिट्यूट, साईसम्राट अर्बन, सुपर्ब चहा उद्योग परिवाराचे मार्गदर्शक विश्वस्त धैर्यशील पाटील यांनी व्यक्त केले.
नेलेॅ (ता. वाळवा) येथे बुद्ध पौर्णिमेनिमित्त आयोजित गौतम बुद्ध जयंती कार्यक्रमात ते बोलत होते. धैर्यशील पाटील म्हणाले, भारतभूमीने जगाला दिलेला सर्वात उज्ज्वल प्रकाश म्हणजे तथागत गौतम बुद्ध होय. आपल्या देशाला व जगालाही त्यांच्या विज्ञाननिष्ठ, शांतीवादी व कल्याणकारी धम्म विचारांची नितांत गरज आहे. गौतम बुद्ध यांचा जन्म इ. स. पू. ५६३ मध्ये झाला. त्यांचा जन्म, महापरिनिर्वाण व ज्ञानप्राप्ती या तीनही घटना वैशाख पौर्णिमेला घडल्या, त्यामुळे वैशाख पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असेही म्हणतात.
यावेळी संचालक विलास झाडे, सम्राटसिंह पाटील, विजय जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला शेखर खडके, नामदेव शेळके, प्यारेलाल जमादार, श्वेता पाटील, अभिलाष पाटील, अनिलकुमार, आदी उपस्थित होते. प्रा. विजय जाधव यांनी प्रास्ताविक केले तर रेश्मा पाटील यांनी आभार मानले.