शिराळा : शिराळा तालुक्यात गेल्या चोवीस तासांत अतिवृष्टी झाली असून, जनजीवन विस्कळीत झाले आहे. चांदोली धरण परिसरात १८५ मिलिमीटर पाऊस पडला आहे. या पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे.
शिराळा शहरासह तालुक्यात बुधवारी रात्रीपासून सांगाव, मांगले, कोकरूड, शिरशी, आरळा, शिरशी, चरण, वाकुर्डे सर्वत्र संततधार पावसाने हजेरी लावली. यामुळे चांदोली धरणासह सर्व मध्यम प्रकल्प, पाझर तलाव, वारणा, मोरणा नदीमधील पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे. यामुळे काही ठिकाणी घरांच्या भिंतींची पडझड झाली आहे.
या दमदार पावसामुळे शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण पसरले आहे. गेल्या चोवीस तासांत चांदोली धरण परिसरात १८५ मिलिमीटर पाऊस पडला. गुरुवारी दुपारी ४ पर्यंत २० मिलिमीटर पाऊस पडला. धरण पाणलोट क्षेत्रातही पाऊस सुरू असल्याने १९ हजार क्युसेकने पाणी धरणामध्ये येत आहे.
चौकट-
गेल्या चोवीस तासांत पडलेला मंडलनिहाय पाऊस कंसात एकूण पाऊस
कोकरूड : १२१.६० ( २३९.८०)
शिराळा : ११४.३० (२२५.४०)
शिरशी : ११५.३० (२२७.४० )
मांगले : ११३.३० ( २२३.५० )
सांगाव : ९९.६० (१९६.४०)
चरण : ११०.१० (२१७.२०)
चांदोली धरण परिसर : १८५.००( २८२.००)