इस्लामपूर : गावागावांत मानसमित्र तयार होणे, ही काळाची गरज आहे. मानसिक आरोग्याबद्दल सजग राहिले पाहिजे, असे मत मानस उपचारतज्ज्ञ डॉ. अनिल डोंगरे (अलिबाग) यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्यावतीने ‘मन के साथ, मन की बात’ या विषयांतर्गत राज्यस्तरीय ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन केले होते. या व्याख्यानमालेतील शेवटचे पुष्प डॉ. अनिल डोंगरे यांनी गुंफले. ‘कुछ तुम बोलो, कुछ हम बोले’ या विषयावर ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, मानसमित्र संवादक आणि कार्यकर्ता या दोन्ही भूमिकेत असतो. त्याने मनोरुग्णाला प्राथमिक पातळीवरचे मार्गदर्शन करताना, योग्य ती माहिती पुरवली पाहिजे, त्याला भावनिक आधार दिला पाहिजे. मानस मित्राला श्रवणाची कला अवगत असावी. रुग्णाला त्याने बोलू द्यावे. प्रतिसाद आणि प्रतिक्रिया यातील फरक नीट समजावून घ्यावा. मानसिक रुग्ण बोलायलाच तयार होत नसतात, ही मोठी अडचण असते. पण सहानभूतीची मर्यादा सांभाळून, रुग्णांबाबत पुरेशी संवेदना बाळगली पाहिजे.
श्रावणी मगर (रायगड) यांनी प्रास्ताविक केले. अशोक निकम (नवी मुंबई) यांनी स्वागत केले. सचिन गोवळकर यांनी सूत्रसंचालन केले. विजय परब (मुंबई) यांनी आभार मानले.