सुरेंद्र शिराळकर
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : माजी आमदार विलासराव शिंदे यांचे पुत्र, भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस वैभव शिंदे शुक्रवारी (दि. २७) जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.
माजी आमदार विलासराव शिंदे राष्ट्रवादी काँग्रेसचे सांगली जिल्हाध्यक्ष होते. त्यांचे पुत्र वैभव शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर बागणी जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढविली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. हा पराभव वैभव शिंदे यांच्या जिव्हारी लागला. यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यांच्या प्रयत्नाने आष्टा येथे अतिरिक्त तहसील कार्यालय सुरू झाले. विलासराव शिंदे यांचे स्वप्न पूर्ण झाले. विलासराव शिंदे अखेरपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहिले. विलासराव शिंदे यांचे काही वर्षापूर्वी निधन झाले. शिंदे यांच्या निधनानंतर वैभव शिंदे आष्टा नगरपरिषदेत सत्ताधारी आष्टा शहर विकास आघाडीचे नेते म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात विविध विकासकामे सुरू आहेत. या विकासकामांना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. मागील काही दिवसांपासून वैभव शिंदे तटस्थ होते. शहराच्या विकासाबाबत जयंत पाटील यांच्यासोबत अनेक वेळा चर्चा झाल्या. या चर्चेतून अखेर मार्ग निघाला असून, शुक्रवारी (दि. २७) दुपारी ४ वाजता जयंत पाटील यांच्या उपस्थितीत वैभव शिंदे सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.
चौकट
पुन्हा एकदा बेरजेचे राजकारण...
आष्टा येथील शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांसोबत वैभव शिंदे यांची बुधवारी (दि. २५) बैठक होणार आहे. वैभव शिंदे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने आष्टा शहरातील राष्ट्रवादी मजबूत होण्यास मदत मिळणार आहे. जयंत पाटील गट व शिंदे गट एकत्र आल्याने आष्टा शहरात बेरजेचे राजकारण पुन्हा वेग घेणार आहे.