लोकमत न्यूज नेटवर्क
संजयनगर : सांगली शहरातील टिळक चौक ते गाव भागाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ड्रेनेजचे काम पूर्ण होऊनही दीड वर्षे डांबरीकरण झाले नाही. यामुळे संतप्त झालेल्या गावभागातील नागरिकांनी चक्क रस्त्यावरच म्हसोबाची स्थापना करून आंदोलन केले. आठ दिवसात महानगरपालिकेने या रस्त्याचे काम मार्गी लावले नाही; तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा स्थानिक नागरिकांनी दिला आहे.
गावभाग टिळकनगरकडे जाणाऱ्या व गावभागातील अंतर्गत रस्त्यावर गेल्या दीड वर्षापूर्वी महानगरपालिका प्रशासनाने ड्रेनेजचे काम केले. यामुळे रस्त्यावर मोठमोठे खड्डे झाले असून अपघाताचे प्रमाण वाढले आहे. परंतु या ठिकाणी खडीकरण आणि डांबरीकरणाचे न झाल्याने स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन गाव भागातील मुख्य रस्त्यावरच म्हसोबाची स्थापना करून पूजा केली.
यावेळी कुणाल गालिंदे, प्रथमेश माळी, सौरभ पाटील, अशोक पाटील, माणिकराव खराडे, सागर देवकर आदी उपस्थित होते.