लोकमत न्यूज नेटवर्क
जत : जत तालुक्यातील सर्वाधिक ग्रामपंचायतींवर काँग्रेस पक्षाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे, परंतु भाजपने मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये सत्तांतर घडवत यश मिळवले. त्यामुळे आगामी सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती व जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
तालुक्यातील शेगाव व उमराणी ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसची जिरविण्यासाठी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्रित येऊन पॅनल उभे केले होते. त्यामुळे तेथे काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले. अंकले येथे जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील यांच्या विरोधात सर्व विरोधक एकत्र येऊन काँग्रेसचा पराभव करून भाजपची सत्ता आणली. उटगीत सरपंच धानाप्पा बिराजदार यांची काँग्रेस पक्षाची सत्ता जाऊन तेथे माजी पंचायत समिती सभापती बसवराज बिराजदार यांनी भाजपची सत्ता आणली. शेगाव ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसचे सरपंच रवी पाटील, महादेव साळुंखे व दत्ता निकम यांची सत्ता जाऊन तेथे भाजपचे लक्ष्मण बोराडे व किरण बोराडे यांची एकहाती सत्ता आली आहे.
उमराणी ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस आणि शेतकरी संघटना अशी तिरंगी लढत झाली. मतविभागणी झाल्यामुळे येथील काँग्रेस पक्षाची सत्ता संपुष्टात आली आहे. सत्तातर होऊन जिल्हा परिषद सदस्य मंगल नामद व आप्पासाहेब नामद यांना एकहाती सत्ता मिळाली आहे. धावडवाडी येथील पिरसाहेब शेख यांनी ऐनवेळी ग्रामपंचायत निवडणुकीच्या तोंडावर भाजपतून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करून पॅनल उभे केले होते; परंतु त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. आयूब शेख, आकतर शेख व चंदुलाल शेख यांनी एकत्रितपणे प्रचार करून काँग्रेस पक्षाची एकहाती सत्ता आणली.
राष्ट्रवादीने वळसंग, उंटवाडी, मोरबगी, धावडवाडी व सोनलगी येथे स्वतंत्र पॅनल उभे करून निवडणूक लढविली होती. परंतु उंटवाडी व सोनलगी येथे स्थानिक आघाडीच्या कार्यकर्त्यासोबत केलेल्या युतीचा त्यांना काही प्रमाणात फायदा झाला आहे.
चौकट
ते नेमके कोणाचे
निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर काही विजयी उमेदवार व पॅनलप्रमुखांनी आजी आणि माजी आमदार यांची भेट घेऊन सत्कार करून घेतला आहे. त्यामुळे ते आमचेच आहेत असा दावा दोन्हीकडून केला जात आहे. परंतु ते नेमके कोणाचे आहेत हे समजून येत नाही.
फोटो- आमदार विक्रम सावंत व माजी आमदार विलासराव जगताप यांचे फोटो वापरणे.