फोटो ओळ : कसबे डिग्रज (ता.मिरज) येथे बैठकीत प्रा.बाळासाहेब मासुले, आनंदराव नलवडे, भीमराव माने, रमेश काशीद उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
कसबे डिग्रज : कृष्णा आणि वारणा नदीच्या महापुराने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. गावागावात घरे, शेती, जनावरे, पाणी योजना, दुकानदार, छोटे व्यावसायिकांचे नुकसान झाले आहे. शासनाने वेळकाढूपणा न करता, त्यांना तत्काळ मदत घ्यावी, अन्यथा जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा कसबे डिग्रज (ता.मिरज) येथील बैठकीत देण्यात आला. याबाबतीत निवेदन मुख्यमंत्री, सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यातील पालकमंत्री व मंत्र्यांना देण्यात येणार आहे.
कसबे डिग्रज सोसायटीमध्ये झालेल्या बैठकीस विविध गावचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, सोसायटी अध्यक्ष, सदस्य, पाणी संस्था, पत संस्था, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
संपूर्ण पीककर्ज माफ करा, शेतीला हेक्टरी दीड लाख रुपयांची मदत द्यावी, पूरबाधित कुटुंबांना तत्काळ आर्थिक मदत द्यावी. त्याचप्रमाणे, वारंवार पुराचा धोका असतो, अशा वसाहतींचे पुनर्वसन करा, शेती आणि नळपाणीपुरवठा नुकसान भरपाई द्यावी, या वर्षीचा शेतीचा मायनर कर माफ करावा. त्याचप्रमाणे, पूरपरिस्थितीत गावागावातून बाहेर जाण्यासाठी एक भक्कम रस्ता तयार करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली.
राष्ट्रवादीचे नेते आनंदराव नलवडे, कवठेपिरानचे उपसरपंच भीमराव माने, सोसायटी अध्यक्ष रमेश काशीद, माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब मसुले, अजित आपटे, बाबासाहेब आडमुटे, बंडू कागवडे, दुधगावचे सरपंच विकास कदम, नितीन दनाने, सरपंच राहुल माणगावे, रवींद्र उपाध्ये, उपसरपंच संजय निकम, कुमार लोंढे, राजराम चव्हाण उपस्थित होते.