वाळवा : वाळवा येथे मंगळवार, दि. ४ ते १५ मेदरम्यान ११ दिवस कडकडीत लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या कालावधीत गावातील रुग्णालये व औषध दुकाने वगळता सर्व व्यवहार बंद राहणार आहेत.
वाळवा ग्रामपंचायत सभागृहात हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष गौरव नायकवडी यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच डाॅ. शुभांगी माळी यांच्या अध्यक्षतेखाली व उपसरपंच पोपट अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत जनता कर्फ्यूबाबत बैठक झाली. या बैठकीत कोरोना साखळी खंडित करण्यासाठी जनता कर्फ्यू यशस्वी करण्याचे ठरले.
यावेळी सरपंच डाॅ. शुभांगी माळी, उपसरपंच पोपट अहिर व युवा नेते गौरव नायकवडी यांनी गावातील कोरोनाची रुग्णसंख्या व मृत्यूच्या प्रमाणाबाबत चिंता व्यक्त केली. यावेळी ४ ते १५ मेपर्यंत रुग्णालय व औषध दुकाने सोडून सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे ठरले. त्याप्रमाणे गावातून ध्वनिक्षेपकावरून माहिती देण्यात आली. गावात भाजीपाला अथवा अन्य काहीही विक्री करता येणार नाही. गावात कोणी बाहेरून नातेवाईक आल्यास त्याची ग्रामपंचायतीकडे नोंद करून कोरोना चाचणी केल्याशिवाय प्रवेश मिळणार नाही.
या बैठकीस ग्रामपंचायत सदस्य उमेश कानडे, इसाक वलांडकर, बाळासाहेब आचरे, प्रताप शिंदे, संदेश कांबळे, बजरंग गावडे, प्रमोद यादव, उमेश सावंत, अजित घोरपडे, प्रकाश गुईंगडे, रमेश जाधव व विजय हिरवे उपस्थित होते.