सांगली : जिल्हा परिषदेच्या सर्व प्राथमिक शाळांमधील दाखले आता एका क्लिकवर ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. त्यासाठीची प्रक्रिया जिल्हा परिषदेने सुरू केली आहे.
अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम राबविला जात आहे. याअंतर्गत प्राथमिक शाळांच्या रजिस्टरमधील दस्ताऐवजी स्कॅनिंग करून ऑनलाईन अपलोड केला जाणार आहे. प्रत्येक शाळेच्या वैयक्तिक लॉगीनमध्ये पीडीएफ स्वरुपात वर्षनिहाय तो उपलब्ध असेल. या कामासाठी नऊ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तशी निविदा नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली. या उपक्रमामुळे सर्व दाखले सुरक्षित राहणार आहेत. जिल्ह्यातील अनेक शाळा स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेल्या आहेत. काही शाळा तर १२५ ते १५० वर्षांपासून कार्यरत आहेत. त्यांच्याकडील रजिस्टर व दाखले जीर्ण झाले आहेत. अत्यंत काळजीपूर्वक ती हाताळावी लागतात. कीड व वाळवीमुळे अनेक रजिस्टर खराबही झाले आहेत. स्कॅनिंगमुळे ही सर्व रजिस्टर आता सुरक्षित राहणार आहेत.