लाेकमत न्यूज नेटवर्क
कवठेमहांकाळ : तालुक्यात कॉंग्रेसला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी, कॉंग्रेस कार्यकारिणीने युवक नेते संजय हजारे आणि अविराजे शिंदे यांच्यावर जबाबदारी दिली आहे. त्यामुळे कवठेमहांकाळ कॉंग्रेस पक्षात नवचैतन्य निर्माण झाले आहे.
कवठेमहांकाळ तालुक्यात बहुतांश ठिकाणी साटे-लोटे, गट-तटाचे राजकारण सुरू आहे. भाजपमध्ये शांतता आहे. अशा अवस्थेत कॉंग्रेस पक्षवाढीसाठी पोषक वातावरण आहे. याचाच फायदा उठवण्यासाठी कॉंग्रेसच्या ज्येष्ठ मंडळींनी तालुक्यातील नामांकित मल्ल, युवक नेते संजय हजारे यांना तालुकाध्यक्ष करत मैदानात उतरवले आहे. साेबतच अविराजे शिंदे यांची कार्याध्यक्षपदी निवड करत हजारे यांना कर्तबगार सोबती दिला आहे.
एकेकाळी तालुक्यात कॉंग्रेसची मोठी ताकद होती. परंतु राष्ट्रवादीच्या हातात तालुक्याचे नेतृत्व गेले आणि कॉंग्रेसला घरघर लागली. अशा अवस्थेतही कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आप्पासाहेब शिंदे, बाळासाहेब गुरव, माणिकराव भोसले, धनाजीराव पाटील, संजय हजारे, भीमसेन भोसले यांच्यासह कार्यकर्त्यांनी तालुक्यात कॉंग्रेस जिवंत ठेवली.
आज तालुक्यातील राजकीय पटलावर कुठेही स्थिरता नाही. कोण कुठे आहे. कोणत्या पक्षात कोण आहे, हेच काही समजत नाही. त्यामुळे जनता योग्य पर्याय शोधत आहे. जो पक्ष जनतेपर्यंत पोहोचेल, सामान्य लोकांचे प्रश्न सोडवण्यास प्राधान्य देईल अशाच पक्षाला यापुढे जनता थारा देईल. तालुक्यात कॉंग्रेसला राजकीय मशागत करण्याची माेठी संधी आहे. म्हणूनच जाणकार मंडळींनी संजय हजारे आणि अविराजे शिंदे या दोघांवर जबाबदारी दिली आहे. संजय हजारे आणि अविराजे शिंदे यांच्या तरुण नेतृत्वाखाली तालुक्यात कॉंग्रेसचे गतवैभव परत आणण्यासाठी जोरदार प्रयत्न आहेत.
संजय हजारे यांचा तालुक्यात मोठा जनसंपर्क आहे. तरुणांमध्ये त्यांची मोठी क्रेज आहे. याचाच मोठा फायदा कॉंग्रेसला पक्षबांधणीसाठी होणार आहे तर अविराजे शिंदे हे सर्वसमावेशक असे युवक नेतृत्व आहे. त्यांचाही मोठा फायदा पक्षबांधणीसाठी होणार आहे. ही दोन युवक नेते ज्येष्ठ नेते बाळासाहेब गुरव, माणिकराव भोसले, धनाजीराव पाटील, वैभव गुरव यांच्या साथीने मैदानात उतरले आहेत. एकूणच या दोघांच्या निवडीने कॉंग्रेस पक्षात उत्साह निर्माण झाला आहे.
फाेटाे : संजय हजारे. अविराजे शिंदे यांचा वापरणे