सांगली : ‘ब’ वर्गातील सहकारी संस्थांच्या निवडणुका आता अंतिम टप्प्यात पोहोचल्या आहेत. बुधवारी सहकार विभागाने ५० सहकारी संस्थांच्या प्रारुप मतदारयाद्या प्रसिद्ध केल्या. यामध्ये बहुतांश पतसंस्था आणि सरकारी कर्मचाऱ्यांच्या सोसायट्यांचा समावेश आहे. येत्या आठवडाभरात तीन बँकांच्या प्रारुप मतदारयाद्याही प्रसिद्ध होणार आहेत. यामध्ये जत, शिराळा आणि पलूस येथील बँकांचा समावेश आहे. सहकारी संस्थांच्या क व ड वर्गातील निवडणुका संपल्यानंतर ‘ब’ वर्गातील मोठ्या पतसंस्था, बँकांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. बुधवारी ज्या संस्थांच्या प्रारुप मतदारयाद्या प्रसिद्ध झाल्या, त्यावर दावे, सूचना, हरकती दाखल करण्यासाठी १३ फेब्रुवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर २१ फेब्रुवारी रोजी जिल्हा उपनिबंधकांमार्फत त्यावर निर्णय घेतले जातील. २६ फेब्रुवारीस मतदारयाद्या अंतिम होऊन त्यानंतर प्रत्यक्ष निवडणूक प्रक्रियेला सुरुवात होईल.यामध्ये मिरज तालुक्यातील सर्वाधिक १३ संस्थांचा समावेश आहे. आटपाडी तालुक्यातील ४, कवठेमहांकाळ तालुक्यातील ९, शिराळा तालुक्यातील ३, तासगाव तालुक्यातील ४, जत तालुक्यातील ४, वाळवा तालुक्यातील ६, पलूस तालुक्यातील १, कडेगाव तालुक्यातील ५ आणि खानापूर तालुक्यातील एका संस्थेचा यात समावेश आहे. ‘ब’ वर्गातील तीन बँकांच्या प्रारुप मतदारयाद्या याच आठवड्यात प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे. उर्वरित ९ बँकांच्याही मतदारयाद्यांचे काम सुरू झाले आहे. फेब्रुवारी महिन्यात ‘ब’ वर्गातील बहुतांश सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम मार्गी लागेल. मार्च, एप्रिल महिन्यात सर्वाधिक निवडणुका होण्याची चिन्हे दिसत आहेत. या निवडणुका लक्षवेधी होणार आहेत. (प्रतिनिधी)महत्त्वाच्या संस्थासांगली जिल्हा परिषद कर्मचारी क्रेडिट सोसायटी, सांगली जिल्हा परिषद अभियंता सहकारी पतसंस्था, सांगली जिल्हा तलाठी व संवर्ग अधिकारी सहकारी पतसंस्था, दि. रयत बँक एम्प्लॉईज क्रेडिट सोसायटी, महांकाली साखर कारखाना कामगारांची सहकारी पतसंस्था अशा महत्त्वाच्या संस्थांच्या निवडणुका या महिन्यात सुरू होणार आहेत.निवडणूका डोळ्यासमोर ठेवून जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीमधील इच्छुकांनी उमेदवारीसाठी फिल्डींग लावली आहे.जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या दोन महत्त्वांच्या संस्थांची निवडणूक लागणार आहे. येथील सत्ता टिकवण्यासाठी सत्ताधाऱ्यांचे प्रयत्न सुरु आहेत.
५0 सहकारी संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू
By admin | Updated: February 6, 2015 00:45 IST