सांगली : कृष्णा नदी प्रदूषणमुक्त राहावी, यासाठी महापालिकेने सुरू केलेल्या गणेशमूर्ती व निर्माल्य दान उपक्रमाला गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवशी नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. रात्रीपर्यंत महापालिकेच्या कृत्रिम कुंडामध्ये आठशेहून अधिक घरगुती गणपतींचे विसर्जन करण्यात आले होते, तर तब्बल २० टन निर्माल्य जमा झाले होते. या जमा झालेल्या निर्माल्यापासून गांडूळ खत तयार केले जाणार असून याचा वापर वृक्ष लागवडीसाठी केला जाणार आहे. यात डॉल्फिन नेचर ग्रुपचेही महापालिकेला मोलाचे सहकार्य मिळाले.नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी गणेशोत्सव काळात निर्माल्य, पूजेच्या साहित्यासाठी महापालिकेच्यावतीने नदीकाठी खास कुंडांची व्यवस्था केली जाते. तसेच गणेशमूर्तीचे दान देऊन त्याचे विधिवत कुंडामध्ये विसर्जन करण्याचा उपक्रम हाती घेतला होता. त्यासाठी कर्मचाऱ्यांचे पथक नियुक्त केले जाते. आयुक्त रवींद्र खेबूडकर, उपायुक्त सुनील पवार, मुख्य लेखापरीक्षक संजय गोसावी यांनी पुढाकार घेऊन मूर्ती व निर्माल्य दान मोहीम व्यापक प्रमाणात राबविली. गणेशभक्तांसह नागरिकांनाही आवाहन करण्यात आले होते. यासाठी जनजागृती केली होती. त्यामुळे यंदा या मोहिमेला मोठा प्रतिसाद मिळाला. उत्सव काळात २० टन निर्माल्य जमा झाले. महापालिकेच्या मोहिमेला पर्यावरण संघटना, स्वयंसेवी संस्थांनी हातभार लावला. (प्रतिनिधी)
आठशे गणपतींचे कृत्रिम कुंडात विसर्जन
By admin | Updated: September 10, 2016 00:42 IST