लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : साथीदाराने चोरी केलेल्या मोटारसायकलींची विक्री करताना खरसुंडी (ता. आटपाडी) येथील एकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने बुधवारी अटक केली. त्याच्याकडून आठ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या. प्रशांत शिवाजी कदम (वय ३३) असे संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, एलसीबीचे सहायक फौजदार अच्युत सूर्यवंशी कुपवाड एमआयडीसी परिसरात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी एक तरुण विनाक्रमांकाची दुचाकी विक्रीसाठी तानंगफाटा येथे येणार असल्याची माहिती बातमीदाराकडून मिळाली. त्यानुसार पथकाने तानंगफाटा येथे सापळा रचला. तेथील बसथांब्याच्या बाजूला एक विनाक्रमांकाची दुचाकी घेऊन प्रशांत कदम थांबला होता. पथकाने त्याच्याकडे दुचाकीच्या कागदपत्रांची मागणी केली, पण त्याने उडावाउडवीची उत्तरे दिली.
सहायक निरीक्षक कुलदीप कदम यांनी दुचाकीचे चेस व इंजीन नंबरवरून मूळ मालकाचा पत्ता शोधला असता ही मोटारसायकल लक्ष्मी मंदिरापासून चोरल्याचे स्पष्ट झाले. प्रशांत कदम याची पथकाने कसून चौकशी केली. कदम याने त्याचे साथीदार अमित मोहिते (वय १९), लक्ष्मण चव्हाण (२२) व विजय निळे (२२, रा. करगणी) यांनी ठिकठिकाणी मोटारसायकली चोरल्या होत्या. त्यांनी त्या आपल्याकडे विक्रीसाठी दिल्याचे सांगितले. सध्या त्याचे तिघेही साथीदार अटकेत असून त्यांच्याकडून १४ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या होत्या. कदम याने खरसुंडीतील घराजवळ आणखी सात मोटारसायकली असल्याची कबुली दिली. त्यानुसार पथकाने त्याच्या घरावर छापा टाकून सात मोटारसायकली ताब्यात घेतल्या. त्याची किंमत ४ लाख २५ हजार इतकी आहे. त्याला पुढील तपासासाठी संजयनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
चौकट
चार जिल्ह्यात चोरी
या टोळीने सांगली, सातारा, सोलापूर व कोल्हापूर या चार जिल्ह्यांत मोटारसायकली चोरल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. कदम याच्याकडे आठ मोटारसायकली सापडल्या. त्या संजयनगर, सांगोला, कराड, शाहुपुरी कोल्हापूर, आटपाडी, विटा, म्हैसाळ येथून चोरल्या असल्याचे पोलिसांनी सांगितले.